सातारा : जावलीत अवैध दारू, मटका अड्डयांचा सुळसुळाट | पुढारी

सातारा : जावलीत अवैध दारू, मटका अड्डयांचा सुळसुळाट

पाचगणी : इम्तियाज मुजावर : जावली तालुक्यात अवैध जोमाने सुरू आहेत. जुगार – मटका खुलेआम सुरू असून दारू विक्रेत्यांचा सुळसुळाट झाला आहे. नव्याने पदभार घेतलेले सपोनि संतोष तासगावकर अवैध धंदेवाल्यांच्या मुसक्या आवळणार का, याकडे जावलीकरांचे लक्ष लागले आहे.

सातारा पोलिस अधीक्षक समीर शेख यांनी पदभार हाती घेतल्यानंतर मोठ्या प्रमाणात जागोजागी कारवाया झाल्या. परंतु, अलिकडे जावलीत जुगार, मटका, अवैध दारू धंदे. गांजा विक्री, असे धंदे मोठ्या प्रमाणात सुरू आहेत. जावलीतील कुडाळ, सोनगाव, करहर, सरताळे, महू धरण, पानस, सायगाव, आनेवाडी, केळघर, मेढा भागात अवैध दारू विक्री गल्लोगल्ली मोठ्या प्रमाणात सुरू आहे. इतकेच नव्हे तर कुडाळ, मेढा, करहर, केळघर यासह इतर रेकॉर्डवरील गुन्हेगार असणारे अवैध धंदेवाले दारू, मटका मोबाईलवरसुद्धा घरपोच सेवा देऊ लागले आहेत. या तालुक्यात प्रचंड किंमतीची इंग्लिश दारुही एका मोबाईल कॉलवरही घरपोहोच होणार याबाबत खात्री असल्याची चर्चा देखील येथे चांगलीच रंगते.

अवैध धंदे करणारे दिवटे, पावटे, हवशे नवशे गवशे जावलीत जागोजागी बक्कळ पैसा कमवू लागले आहेत. मात्र, याकडे अद्यापही कोणाचे लक्ष नाही. आता नव्याने मेढा पोली ठाण्याचे कारभारी म्हणून आलेले सपोनि संतोष तासगावकर यांनी तालुक्यात सुरू असणाऱ्या अवैध धंदेवाल्यांच्या मुसक्या आवळल्या पाहिजेत, तरच दहा वर्षांपूर्वी उभी बाटलीची आडवी बाटली करणाऱ्या रणरागिणींना खऱ्या अर्थाने न्याय मिळेल, असा सूर मकरसंक्रातीच्या निमित्ताने माय भगिनींमधून आळवला जात आहे.

तालुक्यात चारपेक्षा अधिक अवैध दारू, जुगार, मटका चालवणारे चालक-मालक यांची आधी तपासणी करून त्यांच्यावर मोक्कासारखी कारवाई करणे गरजेचे आहे तरच येथील अवैध दारू, जुगार, मटका बंद होऊ शकतो. नव्याने कोणीही दारू, जुगार, मटका धंदा सुरू करण्याचे धाडस करणार नाही. मात्र, गरज आहे ती खमक्या कारवाईची.

जावलीत सगळ्यात जास्त कुडाळ, मेढा गावात मटका, जुगार खेळला जातो, लाखो रुपयांची उलाढाल या गावातून मटक्याची होत असते. अवैध दारूचे तर विचारूच नका, किमान एक ट्रक भरून जावली तालुक्यात रोज दारू खपते. कुठून येते ही अवैध दारू? कोण कोण विक्री करतो? याची तपासणी करणे गरजेचे आहे. जिथून दारू जावलीत विकण्यासाठी आणली जाते त्या दुकानांचे लायसन कायमस्वरूपी रद्द करणे गरजेचे आहे. मटकाप्रकरणी आत्तापर्यंत दाखल झालेले रेकॉर्डवरील गुन्हे पुन्हा एकदा तपासून नव्याने त्यांच्यावर तडीपारचे प्रस्ताव तयार करणे गरजेचे आहे, अशी मागणी तालुक्यातून होऊ लागली आहे.

मेढा पोलीस ठाण्याचे सपोनि संतोष तासगावकर यांनी असे जे महाभाग आहेत त्यांची अवैध धंद्यात सापडल्यानंतर गावातून धिंड काढली पाहिजे, तेव्हाच या अवैध धंद्यांवर अंकुश बसू शकतो. अवैध धंदे करणाऱ्यांना एकदा एकत्रित करून समज द्यावी. गेल्या काही वर्षांपासून खाकीचा धाक यांना राहिलेलाच नाही.

सातारा पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी जावलीतील जुगार, मटका, अवैध दारूबाबत माहिती घेतली तर त्यांना देखील आश्चर्य वाटेल! अशी उलाढाल येथे होत असते. मात्र, आजपर्यंत खमक्या पोलीस अधिकारी जावली तालुक्याला लाभलेला नाही. सपोनि संतोष तासगावकर यांच्यासमोर असणारे हे मोठे आव्हान ते कसे पेलतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. जावलीत गल्लोगल्ली, जागोजागी वाडी वस्तीत अवैध दारू मटका, जुगार असे धंदे चालवणाऱ्यांना कायमस्वरूपी अद्दल घडवण्यासाठी सपोनि संतोष तासगावकर यांनी एक मोहीम उघडावी, अशी मागणी जावलीकरांकडून होऊ लागली आहे.

जावली तालुक्यात सातारा एलसीबी येऊन संपूर्ण गावोगावी या धंद्यांवर नजर मारून जाते. मात्र, कारवाया किती करते, याबाबत प्रश्नचिन्हच आहे. सातारा एलसीबी प्रत्यक्षात ज्या ज्या ठिकाणी कारवाईसाठी भेट देते तेथे कारवाई देखील करून जावे, अशी मागणी व्यसनमुक्ती संघटनेसह सर्वसामान्य नागरिक करत आहेत.

उत्पादन शुल्क विभाग केवळ नावालाच

जावली तालुक्यात दर महिन्याला उत्पादन शुल्क विभागाच्या ऑफिसमधून एक वाहन येते, संपूर्ण तालुक्यात ते फिरते व तालुक्यातून काय नेमके ते घेऊन जाते, हे त्यांनाच माहीत! उत्पादन शुल्क विभागाचा अवैध दारूवरील कंट्रोल आता आऊट ऑफ कंट्रोल झाला आहे.

उत्पादन शुल्क विभागाने जी शपथ वर्दी घालताना घेतली होती त्या शपथेचे पालन आता खऱ्या अर्थाने करण्याची गरज भासू लागली आहे. जावली पोलिस व उत्पादन शुल्क विभागाने जावलीतील दारूचा महापूर रोखून अवैध धंदे उदध्वस्त करण्यासाठी पावले उचलावीत, अशी मागणी व्यसनमुक्ती संघटनेसह सर्वसामान्य महिलांकडून होऊ लागली आहे.

Back to top button