

सातारा : शिरवळ ते लोणंद आणि लोणंद ते सातारा अशा 72 किलोमीटर रस्त्याच्या चौपदरीकरणासाठी 437 कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. दोन भागामध्ये हे काम केले जाणार आहे. निविदा प्रक्रीया पूर्ण झाल्यावर या रस्त्याच्या कामाचा प्रारंभ होणार आहे. नव्याने तयार होणार्या रस्त्यामुळे जलद आणि सुरक्षित आणि दर्जेदार वाहतुक सुविधा शिरवळ, लोणंद, वाठार या परिसराकरता उपलब्ध होणार आहे, अशी माहिती खा. उदयनराजे भोसले यांनी पत्रकाद्वारे दिली.
याबाबत दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, राष्ट्रीय महामार्गावर आणि मार्गालगत सातारा जिल्ह्यातील बहुतांशी भाग जोडला गेला आहे. पुणे -बेंगलोर या महामार्गावरील प्रचंड वाहतुक असते. त्यामुळे शिरवळ ते लोणंद आणि लोणंद ते सातारा या रस्त्यावरुन टोल वाचवण्यासाठी वाहनांची वर्दळ वाढली आहे. या रस्त्यावरुन केलेल्या निरिक्षणात दररोज शिरवळ ते लोणंद मार्गावर 9 हजार 543 वाहने तर लोणंद ते सातारा मार्गावर 11 हजार 175 वाहनांची वाहतूक होत आहे. तसेच या पटयात पावसाळयात बर्यापैकी पर्जन्यमान असल्यामुळे शिरवळ-लोणंद आणि लोणंद - सातारा या मार्गाची दर्जोन्नती करण्यासाठी पाठपुरावा केला. केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांच्या रस्ते वाहतुक मंत्रालयाच्या अंतर्गत असलेल्या राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाव्दारे 437 कोटी रुपयांच्या पेव्हड शोल्डर म्हणजेच फरसबंद खांदा पध्दतीच्या रस्त्याच्या कामासाठी निधी मंजूर झाला आहे.
शिरवळ ते लोणंद या रस्त्यावर 13 आणि लोणंद - सातारा दरम्यान 19 अशा एकूण 32 पुलांची पुर्नबांधणी करण्यात येणार आहे. तर एकूण 7 जंक्शन्स (रस्ते एकत्र येण्याचे ठिकाण) नव्याने तयार करण्यात येणार आहेत. लोणंद- सातारा या मार्गावर 3 नवे पूल उभारण्यात येणार आहेत. तसेच शिरवळ ते सातारा व्हाया लोणंद या मार्गावर एकूण 131 कल्व्हर्टस बांधण्यात येणार आहेत. रेल्वे किंवा रस्ता यांचे खालून पाण्याचा पाट किंवा नळ, भूमिगत नाले इ. व्यवस्थेला कल्व्हर्टस असे संबोधण्यात येते. लोणंद-शिरवळ परिसरातील वाढते नागरीकीकरण आणि स्थिरावलेले औद्योगिकीकरण याचा विचार करता महामार्ग आणि सातारा यांना जोडणारा हा रस्ता दर्जेदार असला पाहिजे, या दूरदृष्टीकोनातून या रस्त्याबाबत आम्ही मांडणी केली होती. त्यासाठी ना. गडकरी यांची भेट घेतली. ना. गडकरी यांनी सकारात्मक प्रतिसाद दिल्याने 437 कोटींचा निधी रस्त्यासाठी मंजूर झाल्याचेही उदयनराजेंनी सांगितले आहे.