साताऱ्यात चौघांकडून बंदुकांचा शस्त्रसाठा जप्त; ४ पिस्टल; ८ काडतुसे | पुढारी

साताऱ्यात चौघांकडून बंदुकांचा शस्त्रसाठा जप्त; ४ पिस्टल; ८ काडतुसे

सातारा : पुढारी वृत्तसेवा : सातारा शहरासह जिल्ह्यात अवैधरीत्या बंदुका वापरल्या जात असल्याचे पुन्हा एकदा समोर आले असून, स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने (एलसीबी) चार युवकांकडून ४ पिस्टल, ८ काडतुसे व १ मॅक्झीन असा शस्त्रसाठा जप्त केला. सुमारे ४ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून संशयित पुणे, सांगली व सातारा जिल्ह्यातील आहेत.

गणराज वसंत गायकवाड (वय २०, रा. काळे वस्ती, दौंड जि. पुणे), आदित्य तानाजी गायकवाड (वय २०, रा. वाठार कि. ता. कोरेगाव जि. सातारा), वैभव बाळासो वाघमोडे (वय २०, रा. दूध डेअरीजवळ, बलघवडे ता. तासगाव), स्वप्नील संजय मदने ( वय २९, रा. किर्लोस्करवाडी ता. पलूस दोन्ही जि. सांगली) अशी अटक केलेल्या संशयित आरोपींची नावे आहेत.

याबाबत अधिक माहिती अशी, सातारा पोलिस जिल्ह्यात बेकायदेशीर बंदुका असणाऱ्यांची माहिती घेत होते. दि. ३० रोजी साताऱ्यातील शिवराज फाटा येथे काहीजण बंदुका विक्री करण्यासाठी येणार असल्याची माहिती एलसीबीला मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा लावून दुचाकीवरुन आलेल्या दोन संशयितांकडून २ पिस्टल जप्त केल्या. संशयितांकडे प्राथमिक चौकशी केल्यानंतर त्यांनी त्यांच्या आणखी दोन मित्रांकडेही २ बंदुका असल्याची माहिती दिली. त्यानुसार पोलिसांनी इतर दोघांकडूनही शस्त्रसाठा, ३ मोबाईल, २ दुचाकी असा एकूण ४ लाख १९ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

सातारा एलसीबीने संशयितांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडील मुद्देमाल जप्त केला. संशयितांवर पोलिस ठाण्यात आर्म अॅक्ट अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. ही कारवाई पोलिस अधीक्षक समीर शेख, अपर पोलिस अधीक्षक बापू बांगर, पोनि अरुण देवकर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली आहे.

दीड महिन्यांत १२ पिस्टल जप्त…

पोलिस अधीक्षक समीर शेख यांनी सातारा जिल्ह्याचा कार्यभार घेतल्यानंतर गुन्हेगारीमुक्त अभियान राबवत धडाकेबाज कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. सातारा जिल्ह्यात बेमालुमपणे बंदुका असल्याने त्याचा शोध घेण्याचा सपाटाच सुरू केला आहे. अवघ्या दीड महिन्यांत आतापर्यंत १२ पिस्टल (घोडा) व १२ जिवंत काडतुसे जप्त करण्यात पोलिसांना यश आले आहे. यापूर्वी एका घटनेत एक किंवा दोन हत्यार सापडायचे; मात्र आप्पा मांढरे हल्ला व शुक्रवारी झालेल्या दोन कारवाईतच एकूण ७ हत्यारे जप्त करण्यात पोलिसांना यश आले आहे.

संशयित सराईत ? पोलिस कोठडी मिळाली…..

एलसीबी पथकाने संशयितांना अटक केल्यानंतर त्यांची माहिती घेतली जात आहे. हे सर्व संशयित साताऱ्यात बंदुका विक्री करण्यासाठी आले असल्याचे समोर आले आहे. विक्री करण्यासाठी आणखी काहीजण होते. ते पसार झाले असून, पोलिस त्यांचाही शोध घेत आहेत. यामुळे संशयितांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. दरम्यान, अटक केलेल्या संशयितांना न्यायालयात हजर केले असता पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.

Back to top button