सातारा : मेढ्यात दोनशे रुपयांच्या बनावट नोटा

सातारा : मेढ्यात दोनशे रुपयांच्या बनावट नोटा

बिभवी : पुढारी वृत्तसेवा ; मेढा बाजारपेठेत २०० रुपयांच्या बनावट नोटांचा सुळसुळाट झाला असून बाजारपेठेतील अनेक दुकानदार, व्यापाऱ्यांना या बनावट नोटा देवून अज्ञाताने फसवले आहे.

या फसवणूकीबाबत कोणीही मेढा पोलीसांत तक्रार दिलेली नाही. शनिवारी सकाळी सव्वाबारा वाजता रमेश काशिळकर यांच्या श्री किराणा स्टोअर्समधून पन्नास रुपयांची खरेदी करुन संबंधीत भामट्याने दोनशे रुपयांची नोट देवून दिडशे रुपये परत घेतले. थोड्या वेळाने सुनिल काशिळकर यांच्या दुकानातून याच भामट्याने खरेदी करुन दोनशे रुपयांची नोट दिली. मात्र, ही नोट बनावट असल्याचे सुनिल काशिळकर यांच्या लगेच लक्षात आले. याबाबतची चर्चा बाजारपेठेत पसरताच आपलीही फसवणूक झाल्याचे इतर दुकानदारांच्या अक्षात आले.

मुख्य बाजारपेठेतील पार्ट किराणा स्टोअर्स, महाकाली कटलरी किराणा स्टोअर्स, खताळ स्वीट मार्ट, मोरे किराणा स्टोअर्स आदी अनेक व्यापाऱ्यांना या भामट्याने दोनशे रुपयांच्या बनावट नोटा देवून फसविले आहे. बनावट नोटांचा प्रकार काहींच्या लक्षात येताच त्यांनी या भामट्याला गाठले. मात्र, आपण मोरावळे गावचे असून साळुंखे नाव असल्याचे सांगून त्याने पोबारा केला. हा भामटा रमेश काशिळकर यांच्या दुकानातील सी. सी. टी. व्ही. कॅमेऱ्यात कैद झाला आहे. त्याने दिलेली दोनशे रुपयाची बनावट नोट खऱ्या नोटेसारखीच दिसते.

या नोटेचा नंबर ९५ केए २०४४९५ असून प्रमोद पार्टे यांना दिलेल्या दुसऱ्या नोटेवरही तोच नंबर आहे. याबाबत अद्याप कुणीही तक्रार दिली नाही. दरम्यान फसवणूक झालेल्या व्यापारी दुकानदारांनी मेढा पोलीस स्टेशनशी संपर्क करण्याचे आवाहन स.पो.नि. अमोल माने यांनी केले आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news