सातारा : मेडिकल कॉलेजमध्ये भंगार घोटाळा करणार्‍यांवर गुन्हा दाखल करा | पुढारी

सातारा : मेडिकल कॉलेजमध्ये भंगार घोटाळा करणार्‍यांवर गुन्हा दाखल करा

खटाव; पुढारी वृत्तसेवा : सातारा येथील मेडिकल कॉलेज उभारण्यात येणार्‍या जलसंपदा विभागाच्या जागेवरील शेकडो इमारती निर्लेखित न करता, त्या पाडण्याचे टेंडर न काढता कोट्यवधींचा भंगार घोटाळा झाला आहे. या प्रकरणात आम्ही लागतील ते पुरावे देतो. दोषीवर गुन्हा दाखल करा अशी मागणी आ. शशिकांत शिंदे यांनी विधीमंडळात केली. दरम्यान, यामध्ये काही चुकीचे घडले असेल तर चौकशी करून कारवाई करण्याचे आश्वासन ना. गिरीश महाजन यांनी दिले.

आ. शशिकांत शिंदे यांनी जोरदार आरोप केला. ते म्हणाले, मेडिकल कॉलेजच्या जागेवरील जलसंपदा विभागाच्या जुन्या इमारती निर्लेखित न करता तसेच पीडब्लूडी, इरिगेशन आणि वैद्यकीय महाविद्यालय विभागापैकी कुणीच परवानगी न देता, निविदा न काढता सर्व इमारती पाडून कोट्यवधींचे भंगार गायब करुन विकण्यात आल्याचा आरोप सभागृहात केला. या विरोधात तक्रारी करुनही त्या दाखल करुन घेतल्या गेल्या नाहीत. उपोषण, आंदोलने करुनही काहीच उपयोग झाला नाही. या प्रकरणात अधिकारी आणि अनेकजण सहभागी आहेत. सरकारच्या तिजोरीवर दिवसाढवळ्या कोट्यवधींचा डल्ला मारणार्‍यांवर कारवाईची मागणी आ. शिंदे यांनी केली.

यावर उत्तर देताना ना. गिरीश महाजन म्हणाले, जलसंपदा विभागाने या इमारती पाडण्याचे टेंडर काढले काढले होते. त्याची माहिती सभागृहाला देण्यात येईल, असे सांगितले. त्यावर आ. शशिकांत शिंदे यांनी भंगाराची चोरी झाल्याचे पुरावे देतो, कोणती वाहने वापरली त्यांचे नंबर देतो, 45 इमारतींचे स्क्रॅप विकलेय. 50 लाखांचा अ‍ॅडव्हान्स घेतला असून गुन्हा दाखल करण्याची मागणी लावून धरली.

कायदेशीर बाबी पूर्ण करुन आणि निविदा काढून इमारती पाडण्याचे काम केल्याचे जलसंपदा विभागाने सांगितले आहे. तरीही या प्रकरणात घोटाळा झाल्याचे आ. शिंदे सांगत असतील तर एक महिन्यात उच्चस्तरीय चौकशी करुन दोषींवर कारवाई करु असे आश्वासन दिले.

Back to top button