

सातारा : रयत शिक्षण संस्थेत विविध पदांवर नोकरीला लावतो असे आमिष दाखवून 19 लोकांकडून 38 लाख 40 हजार रुपये घेवून फसवणूक केल्याप्रकरणी सदाशिव कल्लाप्पा नाईक (रा.तासगाव ता.सातारा) याला शहर पोलिसांनी अटक केली. संशयित सदाशिव नाईक हा रयतमध्ये शिपाई असून त्याने रयतची खोटी नियुक्तीपत्रे दिल्याचेही समोर आले आहे. दरम्यान, फसवणूक झालेले तक्रारदार सांगली, कोल्हापूर जिल्ह्यातील आहेत.
याप्रकरणी नंदकुमार शंकर पाटोळे (वय 43, रा. भवानीनगर, वाळवा जि.सांगली) यांनी सातारा शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फसवणुकीची घटना नोव्हेंबर 2022 ते मे 2023 दरम्यान घडली आहे. तक्रारदार व संशयित सदाशिव नाईक यांची ओळख झाली. नाईक याने तो रयत शिक्षण संस्थेच्या एनकूळ ता. खटाव शाळेत शिपाई असल्याचे तक्रारदार यांना सांगून त्याच शाळेत शिपाई, क्लार्क, शिक्षक व लॅब असिस्टंट पदाच्या जागा सुटल्याचे सांगितले. रयत शिक्षण संस्थेचे सहसचिव, अध्यक्ष व संचालक चांगले ओळखीचे आहेत. कोणी मुलं, मुली असतील त्यांना आपण नोकरी लावू शकतो. आपली सर्वांसोबत चांगली ओळख असल्याचेही त्याने सांगितले.
शिपाई पदासाठी 6 लाख, क्लार्कसाठी 12 लाख, शिक्षकासाठी 15 लाख रुपये याप्रमाणे पैसे द्यावे लागतील. सुरुवातीला अर्ज भरताना 2 ते 3 लाख रुपये लागतील, असेही संशयित सदाशिव नाईक याने तक्रारदार यांना सांगितले. याच पद्धतीने तक्रारदार व त्यांचे मित्र व इतर 19 जणांनी संशयित सदाशिव नाईक याला वेळोवेळी रोख, ऑनलाईन असे 38 लाख 40 हजार रुपये पाठवले. भरतीची सर्व प्रक्रिया झाल्यानंतर संशयित नाईक याने प्रत्येकाला रयत शिक्षण संस्थेचे नियुक्तीपत्र देखील दिले.