

सातारा : एसटी महामंडळाला यंदा शासनाकडून मागणीच्या तुलनेत निम्माच निधी मिळाला. त्यामुळे एसटी कर्मचार्यांना मार्च महिन्यांचे 56 टक्केच वेतन मिळणार आहे. त्यामुळे महामंडळाच्या सातारा विभागातील 3 हजार 766 अधिकारी व कर्मचारी अर्धपगारी राहणार आहेत. त्यामुळे त्यांचे महिन्याचे आर्थिक बजेट कोलमडून गेले असून संसाराचा गाडा हाकताना त्यांना कसरत करावी लागणार आहे.
एसटी महामंडळात झालेल्या संपानंतर राज्य शासनाने एसटी महामंडळातील कर्मचार्यांच्या पगाराची जबाबदारी स्वीकारली होती. सध्यस्थितीत राज्य सरकारकडून एसटी प्रवासी प्रतिपुर्तीच्या रूपाने निधी महामंडळाला पुरवला जातो. एसटी कर्मचार्यांचा पगार दर महिन्याच्या 10 तारखेपर्यंत बँक खात्यात जमा होतो. एसटी कर्मचार्यांच्या पगारासाठी महिन्याला 350 ते 360 कोटी रुपयांची आवश्यकता असते. गेल्या 10 महिन्यांपासून एसटी कर्मचारी भविष्य निर्वाह निधी जमा करण्यात आला नव्हता. यासाठी 40 कोटी रुपये वळते करण्यात आले होते. यामुळे एसटी कर्मचार्यांचे निम्मा पगार खात्यात वर्ग करण्यात आला आहे.
निधीच्या कमतरतेमुळे अप्रेंटिस अर्थात शिकावू कर्मचारी आणि निवृत्त अधिकारी यांचा पूर्ण पगार खात्यात महामंडळाने जमा केला आहे. एसटी कर्मचार्यांना गेल्या काही महिन्यापासून उशिराने वेतन मिळत आहे. त्यात ऐन यात्रा-जत्रा व लग्न सराईच्या हंगामात कर्मचार्यांना अर्धाच पगार जमा करण्यात आला असल्याने सातारा विभागातील 3 हजार 766 एसटी कर्मचार्यांना आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागणार आहे. ऐन सणासुदीत अर्ध्या पगारात कुटुंबाचा चरितार्थ कसा चालवायचा असा प्रश्न एसटी कर्मचार्यांना पडला आहे. प्रत्येक कर्मचार्यांच्या घरात वयोवृध्द आई-वडील आहेत. त्याच्या औषधाचा खर्च शालेय विद्यार्थ्यांचे शिक्षण, बँक, पतसंस्था, सहकारी संस्थामधून काढलेल्या कर्जाचे हप्ते कसे फेडावयाचे अशा अनेक समस्या कर्मचार्यांसमोर आ वासून उभ्या राहिल्या आहेत.
अर्धाच पगार मिळाला असल्याने कर्मचार्यांमधून नाराजी व्यक्त होत आहे. आधीच कर्मचार्यांचे हाल चालू असताना पुन्हा एकदा सरकारने कर्मचार्यांच्या पोटावर पाय दिला आहे. पगाराच्या वेळोवेळी होणार्या कपातीमुळे रोजच्या गरजा भागवणंही कठीण झालं आहे. राज्य शासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे.
एसटी महामंडळाच्या इतिहासात कर्मचार्यांना 56 टक्के पगार देण्याची पहिलीच वेळ आहे. कष्ट करणार्या चालक वाहकांना पगार निम्मा देणं ही शोकांतिका आहे. यामुळे कर्मचार्यांमध्ये असंतोष पसरला असून कुठल्याही क्षणी कर्मचारी आंदोलनाच्या पवित्र्यात आहेत.
शिवाजीराव देशमुख, विभागीय अध्यक्ष, एसटी कामगार संघटना सातारा विभाग