कराडमध्ये कृष्णा नदीपात्रात पोहणार्‍यावर मगरीचा हल्ला | पुढारी

कराडमध्ये कृष्णा नदीपात्रात पोहणार्‍यावर मगरीचा हल्ला

कराड : येथील कृष्णा कोयना नदीच्या संगमावर नदीमध्ये पोहणार्‍या मधुकर लक्ष्मण थोरात यांच्या पायाला मगरीने धरून त्यांना नदीपात्रात ओढण्याचा प्रयत्न केला. मधुकार थोरात यांनी लगबगीने आपला पाय सोडवून घेतला आणि ते पाण्याबाहेर आले. या हल्ल्यात त्यांच्या पायाला जखम झाली आहे. ही घटना शुक्रवारी सकाळी घडली. दरम्यान, या घटनेमुळे परिसरातील नागरिकांध्ये भीतीचे वातावरण पसरले असून वनविभागानेही नदीकाठच्या ग्रामस्थांनी दक्ष राहण्याचे आवाहन केले आहे.

कराड येथील कृष्णा नदीत रोज सकाळी मोठ्या प्रमाणात नागरिक पोहायला येत असतात. रोज पोहणारे तीन मोठे ग्रुप आहेत. सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास सुमारे तीस जणांचा एक ग्रुप या ठिकाणी पोहायला गेला होता. पोहणारे तीन-चार लोक नदीच्या आत बरोबर मध्यभागी गेले असता, यामधील मधुकर थोरात यांच्या पायाला कोणीतरी ओढत असल्याची त्यांना जाणीव झाली. यावेळी त्यांनी पाहिले असता मगरीने त्यांच्या पायाला पकडले असल्याचे त्यांना दिसले. यामुळे ते घाबरले. त्यांनी आरडाओरडा करायला सुरूवात केली.

त्यामुळे त्यांचे इतर दोन मित्र जवळ आले. त्यांनी मधुकर थोरात यांना नदीतून बाहेर काढले. त्यांना सौ. वेणुताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले. दरम्यान या घटनेनंतर कृष्णा नदीमध्ये पोहायला येणार्‍या लोकांमध्ये घबराट निर्माण झाली असून, पोहायला येणारे अनेक लोक या घटनेमुळे नदीकाठीच थांबून होते. वनविभागाने याची माहिती मिळताच नदीकाठच्या नागरिकांनी
दक्ष राहण्याचे आवाहन केले आहे.

Back to top button