सातारा : मुख्यमंत्र्यांच्या गावात... पोलिस बंदोबस्ताचा घामटा | पुढारी

सातारा : मुख्यमंत्र्यांच्या गावात... पोलिस बंदोबस्ताचा घामटा

बामणोली : पुढारी वृत्तसेवा : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दरे तर्फ तांब ता. महाबळेश्वर या त्यांच्या मूळगावी तीन दिवसांच्या दौर्‍यावर आल्यानंतर पोलिसांनी बंदोबस्ताची कसरत पार पाडत चोख कर्तव्य बजावले. पावसाळ्यात कमालीचे हाल होत असताना अनेकदा राहण्यासोबत खाण्याचे वांदे होतात. यामुळे बंदोबस्तावरील पोलिसांचे हाल होऊ नयेत यासाठी अधिक नियोजनाची गरज आहे.

तीन दिवसांपूर्वी मुख्यमंत्री दौर्‍यावर येत असल्याचा संदेश सातारा जिल्हा पोलिस दलाला प्राप्त झाल्यानंतर एसपी समीर शेख यांनी पोलिस यंत्रणेला अलर्ट करून बंदोबस्ताचा प्लॅन केला. मुख्यमंत्री सोमवारी दुपारी आल्यानंतर देवाचे दर्शन, शेतातील कामे करत त्यांनी वेळ
घालवला. दोन रात्र मुक्काम व तीन दिवस असा त्यांचा दौरा झाला. मुख्यमंत्री पहिल्यांदा नारळी पौर्णिमेला आले होते तेव्हा धो-धो पाऊस
पडत होता. त्यावेळी बंदोबस्तावर असणार्‍या पोलिसांचे कमालीचे हाल झाले. जेवणाचे सुद्धा आबाळ झाल्याचे वास्तव आहे. यानंतर मुख्यमंत्र्यांचा झालेला हा दुसरा दौरा.

मुख्यमंत्री येणार असल्याने बामणोली तापोळा परिसरात पोलिसांचा चोख बंदोबस्त लावण्यात आला होता. यामध्ये मुख्यमंत्री आले त्याच्या दुसर्‍या दिवशी कोणालाही भेटण्याची मुभा नसल्याने शिवसागर जलाशयातून अलीकडे व पलीकडे कोणीही ये-जा करू नये याकरता तराफा स्टॉप केळघर तर्फ सोळशी, तापोळा गाढवली या तिन्ही ठिकाणांना पोलिसांच्या छावणीचे स्वरुप आले होते. तसेच तरफ्यामध्ये देखील वीस ते पंचवीस पोलिसांचा रात्रंदिवस तगडा पहारा होता. सातार्‍याहून मुख्यमंत्र्यांना भेटण्यासाठी जाणारे बहुतांश लोक हे बामणोली या ठिकाणाहून पलीकडे जात असल्याने तेथे मेढा पोलिस ठाण्याच्यावतीने चोख बंदोबस्त लावण्यात आला होता.

तसेच तापोळ्यापासून शेंबडी मठापर्यंत दरे बाजूला कोणत्याही बोटींना परवानगी नसल्याने जलाशयामध्ये देखील पोलिसांच्या बोटी फेर्‍या घालत होत्या. दरेगावामध्ये ठिकठिकाणी रस्त्यावर तीन दिवस पोलिसांचा राबता पहारा होता. अशा परिस्थितीमध्ये बंदोबस्तावरील असलेल्या पोलिसांना किमान जेवण, राहण्यासाठी सोय होण्याची अपेक्षा असते. सातारा पोलिसांनी केलेल्या सुयोग्य नियोजनामुळे कुठेही गडबड गोंधळ झाला नाही. कार्यकर्त्यांची वाहने ही जास्तीत जास्त तापोळा व बामणोली या ठिकाणीच पार्क करुन नंतर होडीतून पलीकडे व तिथून पुढे पोलिसांच्या वाहनातून दरे गावापर्यंत कार्यकर्त्यांची ने-आण करण्याची व्यवस्था देखील पोलिसांनी केली.

दोन वर्षांचे बाळ अन् ऑन ड्युटी डीवायएसपी वाईच्या पोलिस उपअधीक्षक डॉ. शीतल जानवे खराडे-पाटील यांचे दोन वर्षाचे बाळ घरीच
होते. सकाळपासून रात्री नऊ वाजेपर्यंत त्या ऑन ड्युटी राहिल्या. पोलिस बंदोबस्तामध्ये कुठेही कुचराई न होता मुख्यमंत्र्यांचा दौरा यशस्वी झाला पाहिजे, ही भावना मनात ठेवून त्यांनी चोख कर्तव्य पार पाडले. स्वतः फिल्डवर रात्रंदिवस काम करुन झोपेची कोणतीही तमा त्यांनी बाळगली नाही. रात्री तराफ्यातून तापोळा मार्गे घरी जाऊन परत पहाटे महाबळेश्वर तापोळा मार्गे परत दरे असा गेली दोन दिवस त्या प्रवास करत होत्या. एक महिला असताना देखील एवढी धावपळ करुन त्यांनी चोख बंदोबस्त केल्याने त्यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

Back to top button