सातारा : जिल्ह्यातील 7 गावे ‘लम्पी’चे हॉटस्पॉट | पुढारी

सातारा : जिल्ह्यातील 7 गावे ‘लम्पी’चे हॉटस्पॉट

सातारा : पुढारी वृत्तसेवा सातारा जिल्ह्यात दिवसेंदिवस लम्पी बाधिी्रत जनावरांची संख्या वाढू लागली आहे. जिल्ह्यातील फलटण तालुक्यातील जिंती, साखरवाडी, खटाव तालुक्यातील निमसोड, अनपटवाडी, धोंडेवाडी, कराड तालुक्यातील वाघेरी व पाटण तालुक्यातील तारळे ही गावे लम्पी रोगाचा हॉटस्पॉट असून या ठिकाणी बाधित जनावरांची संख्या जास्त असल्याने पशुसंवर्धन विभागामार्फत विविध उपाययोजना राबवल्या जात आहेत.

जिल्ह्यात फलटण, सातारा, खटाव, कराड, पाटण, कोरेगाव, माण, खंडाळा, जावली व वाई अशा 10 तालुक्यातील 81 गावांमध्ये लम्पी रोगाची जनावरांना लागण झाली आहे. 1 हजार 56 जनावरांना लम्पीचा प्रादुर्भाव झाला असून 99 जनावरे उपचाराने बरी झाली आहेत. आतापर्यंत सुमारे 62 जनावरांचा मृत्यू झाला आहे. पशुसंवर्धन विभागाच्या मदतीसाठी खासगी संस्थाही धावू लागल्या आहेत.

बॉम्बे प्रायव्हेट प्रक्टिशनर्स असोसिएशन मुंबई यांनी फलटण तालुक्यात मदतीचा हात दिला आहे. साखरवाडी व जिंती येथील प्रत्येक घरात जावून पशुवैद्यकीय अधिकारी जनावरांची तपासणी करुन जनावरांना विविध औषधे व गोळ्या देत आहेत. लम्पी आजाराबाबत काही काळजी घ्यावी, याबाबत पशुसंवर्धन विभागाने सुमारे 40 हजार हून अधिक भित्तीपत्रके व माहितीपत्रके काढली आहेत. गावातील ग्रामपंचायत, सोसायटी, बँक, पतसंस्था, दूधडेअरी, प्राथमिक आरोग्य केंद्र, सरकारी दवाखाने, पोस्ट व अन्य कार्यालयांमध्ये ही माहितीपत्रके लावण्यात येत आहेत.

तसेच पशुसंवर्धन विभागामार्फत प्रत्येक घर टू घर सर्वेक्षण करण्यात येत आहे. यामध्ये जनावरांची शोध मोहीम घेवून लम्पी बाधित जनावरे आढळून येत आहेत. त्यांच्यावर त्वरित औषधोपचार करण्यात येत आहेत. कराड व खटाव तालुक्यातील जनावरांचे 90 टक्के लसीकरण पूर्ण झाले असून, तेथील पथके अन्य तालुक्यातील गावांमध्ये लसीकरणासाठी पाठवण्यात येत असल्याची माहिती जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. संजय शिंदे यांनी दिली.

दरम्यान, सातारा जिल्ह्यातील सातारा,खटाव, फलटण,कराड,पाटण, कोरेगाव, माण, खंडाळा, वाई व जावली या 10 तालुक्यातील 87 गावांमधील 1 हजार 146 जनावरांना लम्पी रोगाची लागण झाली आहे. जिल्ह्यात सोमवारी 13 जनावरांचा मृत्यू झाला असून 75 जनावरे लंपी रोगाला बळी पडली आहेत. तर 154 जनावरे उपचाराने बरी झाली आहे.

बाधित गावांच्या 5 किलोमीटर परिसरातील 539 गावांमधील 2 लाख 47 हजार 553 जनावरांना लसीकरण करण्यात आले आहे. लंपी त्वचारोग औषध उपचाराने बरा होत असल्याने पशुपालकांनी रोग प्रादुर्भावाची लक्षणे जनावरांना आढळून आल्यास त्यांची माहिती नजीकच्या पशुवैद्यकीय दवाखान्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

जिल्ह्यातील 99 जनावरे लम्पीमुक्त…

सातारा जिल्ह्यात लम्पी रोगाचा उद्रेक होत आहे. त्यामुळे जनावरांच्या उपचारासाठी पशुसंवर्धन विभागामार्फत योग्य त्या उपाययोजना राबवल्या जात आहेत. जास्त आजारी असलेल्या जनावरांच्या तपासणीसाठी 5 एमडी फिजीशयन नियुक्त करण्यात आले आहेत. लम्पी बाधित जनावरांवर आवश्यक ते उपचार करत आहेत. आतापर्यंत लम्पी प्रादुर्भाव झालेल्या जनावरांपैकी 99 जनावरे लम्पीमुक्त झाली असल्याचे डॉ. संजय शिंदे यांनी सांगितले.

Back to top button