त्यांच्याकडे ईडी असेल तर आपल्याकडे सीडी : रामराजेंचा खा. रणजितसिंह, आ. जयकुमार गोरेंना टोला

लोणंद : पुढारी वृतसेवा ती मोठी माणसं आहेत, सत्ताधारी आहेत त्यांच्याबद्दल न बोललेल बरं. नाहीतर आपल्या माग ईडी लावतील. लावली तर लावूद्यात, त्यांच्याकडे ईडी असेल तर आपल्याकडे सीडी आहे. बर्याच सीड्या आहेत. मी बोललो की हेडलाईन होते, चौकट होते. मी नाही बोललो तर माध्यम कशी चालणार? मी उदार माणूस आहे सगळ्यांचं चांगलं चालावं असं वाटतं, असा टोला आ. रामराजे ना. निंबाळकर यांनी खा. रणजितसिंह व आ. जयकुमार गोरे यांना लगावला.
आ. रामराजे ना. निंबाळकर यांची राष्ट्रीय कार्यकारिणीवर निवड झाल्याबद्दल लोणंद राष्ट्रवादीच्यावतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी आ. रामराजे बोलत होते. यावेळी आ. मकरंद पाटील, नगराध्यक्षा मधुमती गालिंदे, उपनगराध्यक्ष शिवाजीराव शेळके पाटील, माजी सभापती विनोद क्षीरसागर, डॉ. नितीन सावंत, भरत शेळके, सुभाष घाडगे, सचिन शेळके, गणीभाई कच्छी,सागर शेळके, संभाजी घाडगे, बाळासो शेळके, सपोनि विशाल वायकर व मान्यवर उपस्थित होते.
आ. रामराजे म्हणाले, उपळव्याचाही साखर कारखाना चांगला चालावा, असे मला जरी वाटत असले तरी साखर कारखाना चालवणाराच बिघडलाय त्यामुळे कारखाना बिघडणारच, असा टोलाही त्यांनी लगावला. शेतकर्यांचं चांगलं व्हावं, सर्व कारखाने चांगले चालावेत. उपळव्याचाही चांगला चालावा या मताचा मी आहे. पण कारखाना चालवणाराच बिघडलाय. त्यामुळे कारखाना बिघडणारच. आपण काय बोलणार, अशी टीका रामराजेंनी खा. रणजितसिंह यांच्यावर केली.