

साखरवाडी : पुणे, सातारा व सोलापूर जिल्ह्याची पिण्याची व सिंचनाची तहान भागवणार्या नीरा खोर्यातील भाटघर, नीरा-देवघर, वीर व गुंजवणी या चारही धरणांमध्ये मिळून दि. 19 एप्रिल रोजी 32.86 टक्के पाणीसाठा आहे. गतवर्षी चार धरणांमध्ये 23.09 टक्के पाणीसाठा होता. गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी हा पाणीसाठा 9.77 टक्के इतका अधिक आहे. त्यामुळे कडक उन्हाळा असून सुद्धा नीरा खोर्यातील नीरा उजवा व डावा कालवा पूर्ण क्षमतेने भरून वाहत आहे.
एकूण 48 टीएमसी क्षमता असणार्या चारही धरणांमध्ये दि. 19 एप्रिल रोजी 15.8 टीएमसी पाणी असून गतवर्षी दि. 19 एप्रिल रोजी चारही धरणात 11.1 टीएमसी पाणी शिल्लक होते. नीरा खोर्यात मागील वर्षी मुबलक पर्जनवृष्टी झाल्यामुळे चारही धरणे ऑगस्ट महिन्यामध्ये 100 टक्के क्षमतेने भरली होती.
या चारही धरणांच्या पाण्यावर नीरा डावा व उजव्या कालव्याच्या माध्यमातून पुणे जिल्ह्यातील बारामती, इंदापूर, सातारा जिल्ह्यातील खंडाळा, फलटण व सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस व सांगोला या तालुक्यातील हजारो हेक्टर शेतजमीनीचे सिंचन, नागरिकांसह जनावरांच्या पिण्याच्या पाण्यासाठी अवलंबून आहेत.
नीरा डावा व उजवा कालव्यातून खरीप, रब्बी, पिण्यासाठी व चालू उन्हाळी हंगामातील आवर्तनातून दि. 19 एप्रिलपर्यंत 27 टीएमसी पाण्याचा वापर झाला असून यामुळे सिंचनासाठी व पिण्याच्या पाण्याची या वर्षी अद्यापपर्यंत टंचाई जाणवलेली नाही.