सातारा : पत्नीने कुटुंब नियोजनाचे ऑपरेशन केल्याने दोन चिमुकल्यांवर कोयत्याने वार; निर्दयी बापाला अटक | पुढारी

सातारा : पत्नीने कुटुंब नियोजनाचे ऑपरेशन केल्याने दोन चिमुकल्यांवर कोयत्याने वार; निर्दयी बापाला अटक

कराड: पुढारी वृत्तसेवा : पत्नीने कुटुंब नियोजनाचे ऑपरेशन केल्याचा राग मनात धरून पतीने आपल्या ५ व ६ वर्षे वयाच्या दोन चिमुकल्यांवर कोयत्याने वार केले. कराडजवळ गोटे गावात ही घटना घडली. पोलिसांनी निर्दयी बापाला अटक केली आहे. त्याला न्यायालयात हजर केले असता दोन दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले. रामदास बाबासो वायदंडे (रा. गोटे, ता. कराड) असे अटक केलेल्या बापाचे नाव आहे. तर श्लोक रामदास वायदंडे (वय ५) व शिवम रामदास वायदंडे (वय ६) अशी जखमी झालेल्या दोन चिमुकल्यांची नावे आहेत. यापैकी श्लोक हा गंभीर जखमी असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, रामदास वायदंडे हा रविवारी (दि.१८) सायंकाळी चार वाजल्यापासून त्याच्या पत्नीचे कुटुंब नियोजनाचे ऑपरेशन का केले? व तिला माहेरी का पाठवले? या कारणावरून घरांमध्ये भांडण करीत होता. मुले शिवम व श्लोक यांना हाताने मारहाण करीत होता. तसेच इंदुबाई वायदंडे हिच्यासह आज कोणालाच सोडणार नाही, असे म्हणत होता. त्यामुळे इंदुबाई या शिवम व श्लोक यांना घेऊन घराबाहेर बसल्या होत्या. रात्री साडेआठ ते नऊ वाजण्याच्या सुमारास मुले खेळत खेळत घरामध्ये गेली. त्यांच्या पाठीमागून इंदुबाई याही घरामध्ये गेल्या. तेव्हा रामदास याने घरामधील कोयता हातात घेऊन शिवीगाळ करत आता तुम्हाला ठार मारून टाकतो, असे म्हणून शिवम व श्लोक यांच्यावर कोयत्याने वार केले.

यामध्ये श्लोक याच्या डोक्यावर मागील बाजूस कोयत्याचा वार लागल्याने तो गंभीर जखमी झाला. तसेच शिवम याच्या डाव्या हाताच्या मनगटावर कोयत्याने वार झाल्याने तोही जखमी झाला. यावेळी इंदुबाई वायदंडे यांनी आरडाओरडा केल्याने परिसरातील लोक जमा झाले. त्यांनी रामदास वायदंडे याच्या हातातील कोयता हिसकावून घेत जखमी श्लोक व शुभम या दोन चिमुकल्यांना उपचारासाठी रुग्णालयात हलवले. यापैकी ५ वर्षांच्या श्लोक याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
या घटनेची माहिती मिळताच कराड शहर पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी यांनी त्वरित घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी संशयित रामदास वायदंडे याला अटक केली. त्याला न्यायालयासमोर हजर केले असता दोन दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. याबाबतची फिर्याद दिलीप गुलाब तुपे (रा. मुंढे) यांनी शहर पोलिसांत दिली असून अधिक तपास पोलीस निरीक्षक मारुती सराटे करत आहेत.

ऑपरेशन केलेले टाके कोयत्याने तोडण्याचा प्रयत्न…

रामदास वायदंडे हा आपली आई इंदूबाई, पत्नी मयुरी तसेच शिवम, श्लोक व ३ वर्षांची मुलगी बेला यांच्यासह गोटे येथे राहत आहे. दरम्यान, रामदास व मयुरी यांना एक महिन्यापूर्वी तिसरा मुलगा झाला असून त्यानंतर मयुरी हिने कुटुंब नियोजनाचे ऑपरेशन केले आहे. दरम्यान, मयुरीच्या कुटुंब नियोजनाच्या ऑपरेशनला रामदास याचा विरोध होता. यावरून त्या दोघांमध्ये वाद होता. याचा राग रामदासच्या मनात होता. रामदास हा मयुरीने ऑपरेशन केलेले टाके कोयत्याने तोडण्याचा प्रयत्न करीत होता. म्हणून रामदासच्या आई इंदुबाई वायदंडे यांनी मयुरीला तिच्या माहेरी पाठविले होते, असेही दिलीप तुपे यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे.

हेही वाचलंत का ? 

Back to top button