बारामती, फलटणकरांची घराणेशाही ओक्केच | पुढारी

बारामती, फलटणकरांची घराणेशाही ओक्केच

खटाव : पुढारी वृत्तसेवा पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील भाजपा सरकारमुळे देशात अमूलाग्र बदल होवून अर्थव्यवस्था मजबूत होत आहे. भाजपमध्ये घराणेशाहीला थारा नाही. मात्र, काँग्रेससह राज्यातील राष्ट्रवादीच्या बारामती आणि फलटणकरांची घराणेशाही मात्र एकदम ओक्केच असल्याचा टोला भाजपचे जिल्हाध्यक्ष आ. जयकुमार गोरे यांनी लगावला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसापासून सुरु झालेल्या राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता सेवा पंधरवड्याची सुरुवात करताना ते फलटण तालुक्यातील विविध मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर, भाजपचे संघटक सरचिटणीस शेखर वडणे, जिल्हा सरचिटणीस जयकुमार शिंदे, तालुकाध्यक्ष बजरंग गावडे, विश्वासराव भोसले, पिंटू हिवरे यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

आ. गोरे म्हणाले, देश आणि राज्य प्रगतीपथावर नेणार्‍या भाजपावर जनतेचा मोठा विश्वास आहे. विरोधी पक्षातील अनेकजण भाजपचे कमळ हाती घेत आहेत. आता फलटण तालुक्यातील भाकरी फिरवायची वेळ आली आहे. सगळीकडे एकाच कुटुंबातील व्यक्ती विविध पदे भूषवत आहेत. रामराजेंची घराणेशाही तालुक्यात सुरु असल्याने कुवत असणार्‍या सामान्य कार्यकर्त्यांवर अन्याय होत आहे. त्यांनी सामान्य माणसाला कधी संधीच दिली नाही. इथल्या जनतेला आता आर-पारची लढाई लढून तालुक्यात आमदारकीपासून जिल्हापरिषद, पंचायत समिती व नगपालिकेतही बदल करायची वेळ आली आहे.

माण तालुक्यात सदाशिव तात्यांची 40 वर्षे निष्क्रिय सत्ता होती. तालुक्याचा विकास ठप्प झाला होता. माणच्या स्वाभिमानी जनतेने 13 वर्षांपूर्वी बदल करुन सर्वसामान्य शेतकर्‍याच्या मुलाला आमदार केले. आज तालुक्याचे आणि मतदारसंघाचे चित्र बदलले आहे. गावागावात कोट्यवधींची विकासकामे मार्गी लागली आहेत. रस्त्यांचे जाळे निर्माण झाले आहे. विविध योजनांचे पाणी पोहचले आहे. सर्वत्र उसाची बागायती शेती पिकू लागली आहे. चार साखर कारखाने सुरु आहेत. मात्र, फलटण तालुक्यात रामराजेंनी अनेक वर्षे सत्तेत राहून, मंत्रीपदे भोगून काहीच केले नाही, हे दुर्दैव आहे. लोकांनी त्यांच्यावर अवलंबून राहून त्यांच्या दारात हांजी हांजी करायला गेले पाहिजे, अशी त्यांची वृत्ती असल्याने घराणेशाही बोकाळली आहे. येणार्‍या सर्वच निवडणुकांमध्ये फलटण तालुक्यातील जनतेने सर्वसामान्यांची आणि भाजपची ताकद दाखवत सामान्य माणसांचे राज्य आणावे, असे आवाहनही त्यांनी केले.

खा. रणजितसिंह ना. निंबाळकर म्हणाले, आम्ही विकासकामात कुठेच कमी पडणार नाही. केंद्राच्या जलजीवन, आयुष्यमान अशा अनेक योजना जनतेच्या जीवनात आमूलाग्र बदल करत आहेत. जनतेसाठी असणार्‍या योजना प्रभावीपणे राबवण्यावर भर देत आहोत. फलटण तालुक्यात एमआयडीसी, रेल्वे, फोरलेन रस्त्यांची कामे मार्गी लागत आहेत. ज्यांनी आजपर्यंत तालुक्याला लुटले त्यांना त्यांची जागा दाखवून देण्यासाठी आम्ही वज्रमूठ बांधली आहे. येणार्‍या काळात त्यांना जशास तसे उत्तर देवू . तालुक्यातील गावोगावी विकासपर्व उभे करण्यासाठी आगामी काळात भाजपचे पक्षसंघटन मजबूत करण्यावर आम्ही भर देत आहोत.

चित्ररथातून विकासाचे सादरीकरण

पंतप्रधान मोदींच्या वाढदिवसानिमित्त आयोजित सेवा पंधरवडा मेळाव्यांना फलटण तालुक्यात मोठा प्रतिसाद मिळाला. लोकांनी भाजपाच्या माध्यमातून देशात करण्यात आलेल्या विविध विकासकामांचे बारकाईने अवलोकन केले. मोदी आणि केंद्र सरकारवर जनतेने विश्वास दाखवल्याने देशाची झालेली प्रगती चित्ररथ आणि व्हिडिओ क्लीपच्या माध्यमातून पहाण्यासाठी सर्वत्र गर्दी झाल्याचे पदाधिकार्‍यांनी सांगितले.

Back to top button