Sahyadri tiger presence |
सह्याद्रीच्या जंगलातील दर्‍याखोर्‍यांत ‘एसकेटी 02’ वाघीण निर्भयपणे फिरत आहे.Pudhari Photo

Sahyadri tiger presence : सह्याद्रीच्या दर्‍याखोर्‍यांत 32 वाघांचा वावर

‘एसकेटी 02’ वाघीण ठरली वंशवृद्धीची जननी
Published on

कराड : कणखर सह्याद्रीच्या दर्‍याखोर्‍यांत वाघांचा वंश अभिमानाने वाढतो आहे. या वंशवृद्धीची ‘जननी’ ठरली आहे एक वाघीण. ‘एसकेटी 02’ असा तिचा क्रमांक आहे. 2014 पासून या वाघिणीने तीनवेळा पिल्लांना जन्म दिला असून, तिच्या लेकीदेखील आता सह्याद्रीच्या याच भूमीत प्रजनन करत आहेत. सह्याद्रीच्या दर्‍याखोर्‍यांत एकूण 32 वाघांचा वावर असल्याचे स्पष्ट झाले आहे.

‘वाईल्डलाईफ कॉन्झर्वेशन ट्रस्ट’च्या संशोधनातून समोर आलेल्या या माहितीमुळे सह्याद्रीत वाघांचा कायमस्वरूपी अधिवास असल्याचे शिक्कामोर्तब झाले आहे. वन विभागाच्या सहकार्याने ‘वाईल्डलाईफ कॉन्झर्वेशन ट्रस्ट’चे वन्यजीव संशोधक गिरीश पंजाबी आणि त्यांची टीम हा अभ्यास करत आहे. महाराष्ट्रातील सह्याद्री व्याघ्र प्रकल्प ते कर्नाटकातील काली व्याघ्र प्रकल्पापर्यंत पसरलेल्या ‘सह्याद्री-कोकण वन्यजीव भ्रमणमार्गा’वर सुमारे 32 वाघांचे अस्तित्व आहे. यापैकी केवळ महाराष्ट्रातील सह्याद्रीच्या पट्ट्यात 11 ते 12 वाघ आहेत. या सर्वांमध्ये, ‘एसकेटी 02’ ही वाघीण प्रमुख भूमिका बजावत आहे.

यामधील ‘एसकेटी 02’ या वाघिणीच्या अस्तित्वाची नोंद पंजाबी 2014 सालापासून करत आहेत. यातील ‘एसके’ म्हणजे सह्याद्री-कोकण, ‘टी’ म्हणजे टायगर आणि ‘02’ म्हणजे क्रमांक. अशाप्रकारे वाघांना त्या-त्या विभागानुसार क्रमांक दिला जातो.

जीवनमार्ग (कॉरिडोर) का आहे महत्त्वाचा?

सह्याद्री व्याघ्र प्रकल्प (एसटीआर) आणि काली व्याघ्र प्रकल्प (केटीआर) यांना जोडणारा भ्रमणमार्ग वाघांच्या नैसर्गिक वाढीसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. सध्या सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात केवळ नर वाघ असले, तरी या भ्रमणमार्गात प्रजनन करणार्‍या माद्यांची उपस्थिती भविष्यात माद्यांद्वारे सह्याद्रीचे नैसर्गिक पुनर्वसन होण्याची शक्यता वाढवते. चांगल्या वन व्यवस्थापनामुळे तिलारी ते राधानगरी आणि पुढे चांदोली ते कोयना हा संपूर्ण मार्ग सुरक्षित राहिला असून, त्याचे महत्त्व या संशोधनाने अधोरेखित केले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news