जर्मनीत ढोल, ताशा, लेझीमसह पारंपरिक वाद्यांच्या निनादात गणेशोत्सव उत्साहात | पुढारी

जर्मनीत ढोल, ताशा, लेझीमसह पारंपरिक वाद्यांच्या निनादात गणेशोत्सव उत्साहात

मसूर (सातारा) : पुढारी वृत्तसेवा: यंदाच्या वर्षी जर्मनी येथील एरलांगन शहरात प्रथमच ढोल, ताशा व झांज पथकाच्या निनादात आणि लेझीम ठेक्यात पारंपरिक पद्धतीने गणेश उत्सव साजरा करण्यात आला. मराठी विश्व फ्रांकेन, जर्मनी आयोजित या कार्यक्रमासाठी रमणबाग युवा मंच, जर्मनी या ढोल, ताशा पथकाला पाचारण करण्यात आले होते. सुमारे तासभर ढोल सुरू होता. ढोल ताशा पथकाने पुण्याचा अलका चौक डोळ्यापुढे उभा केला.

१८ जणांच्या ढोल, ताशा व झांज पथकासोबत ३८ महिला व पुरुष गटाने लेझीम सादर करून उपस्थित जर्मन आणि जर्मनी स्थित भारतीय रसिक प्रेक्षकांची मने जिंकली. कार्यक्रमात छोट्या मुलांनी थोर भारतीय महापुरुषांची वेशभूषा करून हजेरी लावत उपस्थितांना मिनी इंडियाचे दर्शन करून दिले.

कार्यक्रमाअंतर्गत मुलांना शाडू माती पासून गणपती मूर्ती घडवण्याचे प्रशिक्षण देण्यात आले. यामध्ये २५ मुलांनी सहभाग घेऊन छान व सुबक गणेश मूर्ती तयार केल्या. या भारतीय मूर्तिकारांसोबत जर्मनीच्या नागरिकांनाही फोटो काढण्याचा मोह आवरता आला नाही .
गणेश उत्सव कार्यक्रमात प्रथेनुसार गणेश मूर्ती स्थापना, आरती, अथर्वशीर्ष पठण, राजोपचार, सवाद्य मिरवणूक व विसर्जन करण्यात आली. हा कार्यक्रम एरलांगन राटहाऊस म्हणजे तेथील गर्व्हमेंट ॲाफीसच्या समोर आयोजित करण्यात आला होता. प्रथमच हा कार्यक्रम खुल्या मैदानावर व खूप मोठ्या प्रमाणावर घेण्यात आला. जर्मनी आणि युरोपचा झेंडा जिथे कायम उंचावर फडकतो, तिथे आपला भगवा फडकला.

या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी जर्मन स्थित सर्व भारतीयांनी मनापासून सहकार्य केले. आणि त्यांना जर्मनीच्या नागरिकांनी भरभरून प्रतिसाद दिला. या कार्यक्रमात जवळपास आठशे लोकांनी सहभाग नोंदवला. हे घडवून आणल्याबद्दल मराठी विश्व फ्रांकेन मंडळाचे संस्थापक रश्मी गावंडे, तृप्ती सपकाळ, अमोल कांबळे, प्रशांत गुळस्कर यांचे खूप कौतुक आहे.

हेही वाचलंत का ? 

Back to top button