महिलांनी उद्योग-व्यवसायात पदार्पण करावे : चित्रा वाघ | पुढारी

महिलांनी उद्योग-व्यवसायात पदार्पण करावे : चित्रा वाघ

सातारा : पुढारी वृत्तसेवा चार बायका एकत्र आल्यावर फक्त गप्पा मारत नाहीत तर त्या उद्योगपण करतात. महाराष्ट्रातील महिला या उत्कृष्ठ व्यावसायिक आहेत. त्यांनी पुढे येवून मोठ्या उद्योग-व्यावसायात पदार्पण करावे, असे आवाहन भाजपा महिला आघाडीच्या नेत्या चित्रा वाघ यांनी केले. नारी शक्ती फाऊंडेशनच्यावतीने पोलिस करमणूक केंद्रातील अलंकार हॉलमध्ये आयोजित गौरी गणपती खरेदी महोत्सवाच्या उद्घाटनप्रसंगी त्या बोलत होत्या. यावेळी जिल्हा पोलिस प्रमुख अजयकुमार बन्सल, नारी शक्ती फाऊंडेशनच्या संस्थापिका सुनिशा शहा व असंख्य महिला उद्योजक उपस्थित होत्या.

चित्रा वाघ म्हणाल्या, आजूबाजूच्या महिला काहीतरी करत असताना त्यांना प्‍लॅटफॉर्म मिळवून देण्यासाठी सुनिशा शहा यांची धडपड असते. अशाच प्रकारे गोव्यातही महिलांना बाजारपेठ मिळवून देण्याचा त्यांचा मानस आहे. तो पूर्ण होण्यासाठी मुख्यमंत्र्यांकडे मी पाठपुरावा करणार आहे. आपल्या गावात, भागात खूप टॅलेंट आहे. डोक्यात खूप आयडीयाज असतात. परंतू त्याला आवश्यक बाजारपेठ मिळवणेही तितकेच महत्वाचे आहे. त्यासाठी मार्गदर्शनाची गरज असते. ही गरज नारी शक्ती फाऊंडेशनने पूर्ण केली आहे.

सुनिशा शहा म्हणाल्या, सामाजिक कामामध्ये माझे प्रेरणास्थान चित्रा वाघ असून त्यांच्याकडून मला ऊर्जा मिळते. या महोत्सवाला सातारकरांनी आवर्जून भेट द्यावी आणि महिला व्यावसायिकांनी तयार केलेल्या विविध वस्तू खरेदी कराव्यात, असे आवाहन शहा यांनी केले. दरम्यान, या महोत्सवामध्ये गौरी व गणपती सजावटीच्या अनेक आकर्षक वस्तू, कपडे, इमिटेशन ज्वेलरी, घरगुती वापराच्या वस्तू एकाच छताखाली उपलब्ध झाल्या आहेत. त्यामुळेच खरेदीसाठी सातारकरांचा या महोत्सवाला प्रतिसाद मिळत आहे. या महोत्सवामध्ये इच्छुक महिलांना रांगोळी प्रशिक्षणही देण्यात आले.

Back to top button