

वाई : पुढारी वृत्तसेवा भाजपचे लोकसभेचे मिशन सातारा यशस्वी करण्यासाठी सध्या मोर्चेबांधणी सुरु असून त्याच अनुषंगाने केंद्रीय वाणिज्यमंत्री सोमप्रकाश हे तीन दिवसांसाठी सातारा जिल्ह्याच्या दौर्यावर येत आहेत. दौर्याची सुरुवात वाईचा महागणपती व कृष्णामाईची महाआरती करून होणार आहे. या दौर्यामुळे तरी वाई विधानसभा मतदार संघातील भाजप पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्यामधील बंडाळी व बेकीचे वातावरण दूर व्हावे व पक्ष बळकट व्हावा, अशी अपेक्षा पक्षाच्या कार्यकर्त्यांकडून व्यक्त होत आहे. वाई तालुका व हा विधानसभा मतदार संघ आ. मकरंद पाटील यांचा बालेकिल्ला मानला जातो. या तालुक्यातील अनेक संस्थांवर राष्ट्रवादीची एकहाती सत्ता आहे. ती एकहाती सत्ता येण्यासाठी भाजपचे काही पदाधिकारी पडद्याआडून सहकार्य करतात.
भाजपचे अनेक पदाधिकारी एकमेकांची जिरवण्यात धन्यता मानतात. देशावर राज्य करणार्या भाजपची अवस्था वाई तालुक्यात तरी अतिशय दयनीय झाली आहे. त्याला दुसरा कुठला पक्ष जबाबदार नाही, तर हेच एकमेकांचे पाय ओढण्यात मग्न असतात, ही वस्तुस्थिती आहे. वाई तालुक्यात पक्षीय बलाबलाचा विचार केल्यास राष्ट्रवादीला टक्कर देणारा भाजपच आहे. परंतु, काँग्रेसमधून भाजपात प्रवेश केलेले माजी आमदार मदनदादा भोसले यांना आणखी तडफेने व सर्वांना सामावून घेवून काम करावे लागणार आहे.
पदाधिकार्यांमधील मतभेद मिटवून संघटना जोमाने कार्यरत करावी लागणार आहे. तरच या मतदार संघात भाजपा बळकट होणार आहे. येणार्या केंद्रीय मंत्र्यांनी प्रोटोकॉल म्हणून वाई तालुक्याचा दौरा न करता मुळाशी जावून पक्षाची संघटना मजबूत करण्यासाठी प्रयत्न करण्याची नितांत गरज आहे. पक्षाच्या गद्दारांवर कडक कारवाई करण्याची व प्रामाणिकपणे काम करणार्या पदाधिकारी व कार्यकर्ते यांना पक्षाची ताकद देण्याची आवश्यकता आहे.
वाई मतदार संघात मदनदादांच्या माध्यमातूनच भाजप तळागाळात पोहोचणार आहे. त्यासाठी त्यांना जनतेच्या दरबारात सातत्याने कार्यरत रहावे लागणार आहे. पक्षातील जुनी फळी नव्याने प्रवेश केलेल्यांना आपलं मानायला तयारच नाही. त्यामुळे वाई मतदार संघातून लोकसभेसाठी अपेक्षित मतदान आवश्यक असल्यास भाजपमधील बंडाळी मोडून काढावी लागणार आहे. संघटनवाढीच्या मुद्याला बगल देवून भाजपला वाई विधानसभा मतदार संघात राष्ट्रवादीला टक्कर देणे सोपे नाही.