मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत होणार उंब्रजमधील शिवस्मारकाचे भूमिपूजन | पुढारी

मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत होणार उंब्रजमधील शिवस्मारकाचे भूमिपूजन

उंब्रज : पुढारी वृत्तसेवा उंब्रज (ता. कराड) येथील बाजारपेठेत मध्यवर्ती ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज यांचा भव्य अश्वारूढ पुतळ्यासह शिवस्मारक उभारले जाणार आहे. या शिवस्मारकाचे भूमिपुजन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांच्यासह मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे समर्थक गटाचे जिल्हा संपर्क प्रमुख शरद कणसे यांनी उंब्रजमध्ये येऊन नुकतीच पाहणी केली. उंब्रज येथे छत्रपती शिवाजी महाराज यांचा अश्वारूढ पुतळा व्हावा, ही उंब्रजसह परिसरातील विविध गावच्या नागरिकांसह जिल्ह्यातील शिवप्रेमींची मागणी होती. ही मागणी पूर्ण करण्यासाठी सर्व कागदपत्रांचे सोपस्कर येथील श्री शिवयोद्धा प्रतिष्ठानने करून पुतळा उभारण्याची जबाबदारी घेतली.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व ना. शंभूराज देसाई यांच्या हस्ते नियोजित शिवस्मारकाचे भूमिपूजन करण्याचे या प्रतिष्ठानने ठरवले आहे. त्या संदर्भात ना. शंभूराज देसाई यांच्या माध्यमातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना संपर्क करण्यात आला व त्यांच्या सूचनेनुसार शरद कणसे यांनी नियोजित स्मारकाची पाहणी केली. यावेळी गोविंद उबाळे, श्री शिवयोद्धा प्रतिष्ठानचे अध्यक्ष संतोष बेडके, उपाध्यक्ष शरद जाधव यांचयासह अन्य पदाधिकारी व मान्यवर उपस्थित होते.

Back to top button