‘पॉस’वरून ग्राहक दुकानदारांमध्ये खटके | पुढारी

‘पॉस’वरून ग्राहक दुकानदारांमध्ये खटके

भणंग : पुढारी वृत्तसेवा जावली तालुक्यात धान्य वितरणासाठी असलेले पॉस मशिन वारंवार बंद पडत असल्याने धान्य दुकानदार आणि ग्राहक यांच्यात खटके उडत आहेत. जावलीत एकूण 94 स्वस्त धान्य दुकाने असून याद्वारे विविध कार्डधारकांना धान्याचे वाटप होते. अंत्योदय कार्डधारक संख्या 1557 आणि पिएचएच कार्डधारक संख्या 18009 एवढी आहे. त्यांना रेशन दुकानांमार्फत पंतप्रधान गरीब कल्याण योजनेअंतर्गत व नियमित धान्यवाटप हे पॉस मशिनमार्फत केले जाते.

परंतु, गेल्या काही महिन्यांपासून पॉस मशीन वारंवार बंद पडत आहे. सर्व्हरबाबतही अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. यामुळे धान्य वितरणात अडचणी येत आहेत. पॉस मशीन वारंवार बंद पडत असल्याने दुकानदार आणि कार्ड धारक यांच्यामध्ये खटके उडत आहेत. काही ठिकाणी हातघाईपर्यंत प्रकरण जात आहे. अनेकवेळा तर महिन्याचे धान्य त्या महिन्याच्या अखेरीला मिळत आहे. अगोदरच उशिरा येणारे धान्य आणि त्यातच धान्य वाटप करताना अनेक वेळा पॉस मशीनचा सर्व्हर बंद पडत आहे किंवा स्लो चालत आहे. जावली तालुका हा दुर्गम व डोंगराळ असल्यामुळे अनेक वेळा रेंज जाण्याचे प्रमाणही जास्त आहे.

ग्रामीण भाग असल्याने कार्डधारकांना धान्यासाठी तीन चार किलोमिटर पायपीट करावी लागते. त्यातच पॉस मशिन बंद असल्यावर चार पाच हेलपाटे ग्राहकांना पडत आहेत. त्यामुळे भिक नको पण कुत्रे आवर, असे म्हणण्याची वेळ जावली तालुक्यातील कार्डधारकांवर आली आहे. पॉस मशीनचा सर्व्हर हा लवकरात लवकर दुरुस्त करावा, गोदामातून येणारे धान्य हे दर महिन्याच्या एक ते पाच तारखेपर्यंत मिळावे, ऑनलाईन धान्यसाठा लवकर मिळावा, आदी मागण्या धान्य वितरक व ग्राहकांनी केल्या आहेत.

Back to top button