सातारा : मुख्यमंत्र्यांचे जिल्ह्यात जल्लोषी स्वागत | पुढारी

सातारा : मुख्यमंत्र्यांचे जिल्ह्यात जल्लोषी स्वागत

महाबळेश्‍वर; पुढारी वृत्तसेवा : महाबळेश्वर तालुक्याचे सुपुत्र,महाराष्ट्राचे मुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्रीपदी विराजमान झाल्यावर प्रथमच आपल्या जन्मगावी दरे येथे येत असल्याने कोयनाकाठ आनंदला आहे. महाबळेश्वरमधील छ. शिवाजी महाराज चौकात धुवाँधार पावसात फटाक्यांच्या आतषबाजीत मुख्यमंत्री ना एकनाथ शिंदे यांचे समर्थकांकडून जल्‍लोषात स्वागत करण्यात आले. यावेळी कॅबिनेट मंत्री ना. शंभूराज देसाई, जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी, पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल, पुरूषोत्तम जाधव आदी उपस्थित होते.

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्रीपदी विराजमान झाल्यानंतर प्रथमच महाबळेश्वर येथे येणार असल्याने त्यांच्या समर्थकांमध्ये उत्साहाचे वातावरण होते. बुधवारी रात्रीपासूनच ना. शिंदे यांच्या स्वागताची जय्यत तयारी करण्यात आली होती. समर्थकांकडून सर्वत्र स्वागताचे फलक लावण्यात आले होते. सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास ते आपल्या जन्मगावी दरे येथे जाण्यासाठी महाबळेशवर मार्गे निघाले असता येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे समर्थकांच्या आग्रहाखातर थांबले. यावेळी शिंदे यांच्या समर्थनार्थ समर्थकांकडून गगनभेदी घोषणा देण्यात आल्या.

मुख्य चौकात अपर जिल्हाधिकारी श्रीमती माधवी सरदेशमुख, तहसीलदार सुषमा चौधरी पाटील यांच्यासह प्रशासक तथा मुख्याधिकारी पल्लवी पाटील यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. तदनंतर छत्रपती शिवाजी महाराज चौकातील मंदिरामध्ये देवीला पुष्पहार अर्पण करण्यात आला. महिलांनी मुख्यमंत्र्यांचे औक्षण केले.

माजी नगरसेविका विमल ओंबळे यांनी ना.एकनाथ शिंदे यांना राखी बांधली. मुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे, कॅबिनेट मंत्री ना. शंभूराज देसाई, पुरषोत्तम जाधव यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी ना. शिंदे यांचे कट्टर समर्थक शिवसेनेचे विजय नायडू, माजी नगरसेवक कुमार शिंदे, सतीश ओंबळे शिवजयंती उत्सव समितीचे प्रवीण जिमन, संतोष आखाडे आदी उपस्थित होते.

ना. एकनाथ शिंदे यांना माजी नगराध्यक्षा स्वप्नाली शिंदे, माजी नगरसेवक कुमार शिंदे यांनी 25 किलो वजनाचे पितळी शिवलिंग भेट म्हणून दिले तर पंचायत समितीचे माजी सभापती संजूबाबा गायकवाड, शिवसेनेचे ज्येष्ठ नेते डी. एम. बावळेकर, माजी नगरसेवक संदीप साळुंखे आदींनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. यावेळी सतीश ओंबळे, सलीम बागवान, सचिन शिंदे, संदीप आखाडे, सैफ वारुणकर, संतोष आखाडे, सचिन गुजर, प्रशांत उन्नीभवी, सुनील ढेबे, गणेश शिंदे, प्रमोद गोंदकर, राहुल पिसाळ, सागर सोनावणे, किरण मोरे, पालिकेचे आबाजी ढोबळे, सचिन दीक्षित व अधिकारी उपस्थित होते.

शिंदेवाडी व शिरवळमध्ये झुंबड

नायगाव; पुढारी वृत्तसेवा : मुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे यांचे सातारा जिल्हावासियांतर्फे महामार्गावर जिल्ह्याच्या सिमेवरील शिंदेवाडी, शिरवळ येथे जोरदार स्वागत करण्यात आले. यावेळेला कॅबिनेटमंत्री ना. शंभूराज देसाई, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष नितीन भरगुडे-पाटील, शिवसेनेचे माजी जिल्हा प्रमुख पुरूषोत्तम जाधव यांच्यासह विविध पदाधिकार्‍यांनी व शिंदे गटातील शिवसैनिकांनी तुफान गर्दी केली होती. शिंदेवाडी, ता. खंडाळा येथे जेसीबीच्या सहाय्याने मुख्यमंत्र्यांवर पुष्पवृष्टी करण्यात आली.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व कॅबिनेट मंत्री शंभूराजे देसाई यांचे आगमन झाल्यानंतर सातारा जिल्हा पोलीस दलामार्फत मानवंदना देण्यात आली. यावेळी कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक मनोज लोहिया, जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी, पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल, मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा, प्रांताधिकारी राजेंद्र जाधव, तहसिलदार दशरथ काळे, फलटणचे पोलीस उपविभागीय अधिकारी तानाजी बरडे, शिरवळ पोलीस निरीक्षक नवनाथ मदने, शिरवळच्या सरपंच लक्ष्मी पानसरे आदी उपस्थित होते. पुरुषोत्तम जाधव यांनी मुख्यमंत्र्यांचा शाही पगडी घालून सन्मान केला. यावेळी जि. प माजी उपाध्यक्ष नितीन भरगुडे-पाटील, शिवसेनेचे प्रदीप माने, भूषण शिंदे, गुरुदेव बरदाडे, अनुप सूर्यवंशी, अनिरुध्द गाढवे तसेच तालुक्यातील विविध पदाधिकारी उपस्थित होते. शिंदेवाडी येथील स्वागतानंतर मुख्यमंत्री शिरवळला पोहचताच भारतीय जनता पार्टीच्यावतीने निखिल झगडे आदींनी त्यांचे स्वागत केले.

Back to top button