सातारा : भोसे-पांगारीत स्वच्छता मोहीम | पुढारी

सातारा : भोसे-पांगारीत स्वच्छता मोहीम

पाचगणी : पुढारी वृत्तसेवा : स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवा निमित्त स्वच्छता अभियानाचा शुभारंभ जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा यांनी स्वतः स्वच्छता मोहिमेत सहभागी होऊन केला.

ग्रामपंचायत भोसे, पांगारी आणि हिलदारी यांच्या संयुक्त विद्यमाने स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त ही मोहीम हाती घेण्यात आली आहे. यावेळी प्रांताधिकारी राजेंद्र जाधव, तहसीलदार सुषमा चौधरी – पाटील, गट विकास अधिकारी अरुण मरभळ, मंडल अधिकारी विजय ढगे, ग्रामसेवक आर व्ही चव्हाण, तलाठी नीलेश गीते, दीपक पाटील आदी उपस्थित होते.

पाचगणी-महाबळेश्वर या मुख्य रस्त्यालगत दोन्ही बाजूला दांडेघर, भोसे व पांगारी दरम्यान मोठ्या प्रमाणात कचरा टाकला जातो. हे कचर्‍याचे ढीग हटवून कचरामुक्त रस्त्यासाठी भोसे आणि पांगारी ग्रामपंचायती कार्यरत आहेत. अमृतमहोत्सवी वर्षाचे औचित्य साधून ही स्वच्छता मोहीम राबविण्यात आली.

सीईओ गौडा यांनी पांगारी व भोसे ग्रामस्थांशी संवाद साधून श्रमदानाबरोबर विविध कार्यक्रम या कालावधीत आयोजित करण्याबाबत चर्चा केली व सूचना दिल्या.त्यानंतर विनय गौडा, प्रांत राजेंद्रकुमार जाधव, गटविकास अधिकारी अरुण मरभळ यांनी या स्वच्छता मोहिमेत सहभाग घेतला.

या मोहिमेत वन व्यवस्थापन समितीचे वनाधिकारी, भोसे, पांगारीचे सरपंच, सदस्य, ग्रामस्थ व मान्यवर सहभागी झाले होते.
भर पावसात ग्रामस्थांनी या मोहिमेत सहभाग घेवून परिसर स्वच्छ केला. त्यामुळे पाचगणी- महाबळेश्‍वर या रस्त्याच्या बाजूचा परिसर स्वच्छ झाला.

Back to top button