महाबळेश्वर परिसरात पडझड | पुढारी

महाबळेश्वर परिसरात पडझड

महाबळेश्वर : पुढारी वृत्तसेवा महाबळेश्वर शहर व परिसरात पावसाने दाणादाण उडवली असून महाबळेश्वर -पाचगणी रस्त्यावर बगीचा कॉर्नर नजीक पाणी आल्याने वाहतूक विस्कळीत झाली. वादळी वार्‍याने तालुक्यातील घावरी गावात झाड कोसळले. महाबळेश्वर व परिसरात गेली आठ दिवस जोरदार पाऊस कोसळत असल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. महाबळेश्वर, पाचगणी रस्त्यावर पाणी आल्याने बुधवारी दिवसभर वाहनचालकांना पाण्यातून वाहने काढताना चांगलीच कसरत करावी लागली. गहू गेरवा केंद्र परिसरातून येणार्‍या पाण्याच्या लोंढ्याने रस्त्यावर पाणी साचते. गेली अनेक वर्षे वेण्णालेक परिसर व पाचगणीकडे जाणार्‍या रस्त्यासंदर्भात सार्वजनिक बांधकाम खात्याकडून कायमस्वरूपी उपाययोजना होत नसल्याने दरवर्षी हीच परिस्थिती पहावयास मिळते.

सध्या वेण्णालेक परिसर दाट धुक्यात हरवून गेला आहे. लिंगमळा परिसरातही पावसाचा जोर अधिक होता. धुवाँधार पाऊस व सोसाट्याच्या वार्‍यामुळे शहरात काही ठिकाणी झाडे उन्मळून पडण्याचे प्रकार घडले. हॉटेल सेवाय येथे बुधवारी पहाटे झाड पडल्याने नुकसान झाल्याची माहिती मिळत आहे. तालुक्यातील घावरी या गावात घराजवळच झाड कोसळले.धुवाँधार पावसाने तालुक्यातील ओढे, नद्या, नाले दुथडी भरून वाहत आहेत. बुधवारी दिवसभरात 87.2 मि मी (03 इंच) पावसाची नोंद झाली आहे.

Back to top button