बँक लुटण्याचा प्रयत्न; संशयितांना कोठडी | पुढारी

बँक लुटण्याचा प्रयत्न; संशयितांना कोठडी

पुसेसावळी : पुढारी वृत्तसेवा जयराम स्वामींचे वडगाव येथील सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेची शाखा लुटण्याचा प्रयत्न करणार्‍या तिघा संशयितांना औंध व पुसेसावळी पोलिसांनी एका चारचाकी वाहनासह जेरबंद केले. त्यांना दोन दिवसाची पोलिस कोठडी न्यायालयाने सुनावली. हर्षवर्धन हरिशचंद्र घार्गे (वय 20, रा. शाहुनगर), यश संजय घार्गे वय 19, रा. दौलतनगर ता. जि. सातारा) व ऋषीकेश सोमनाथ नागमल (वय 20, रा. वडगाव ज.स्वा) अशी संशयितांची नावे आहेत. याबाबत पोलिसांकडून मिळेलेली माहिती अशी, जयराम स्वामींचे वडगाव येथील सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेची शाखा लुटण्याचा काही अज्ञातांनी प्रयत्न केला. मात्र, बँकेचा भोंगा वाजल्याने त्यांचा हा डाव फसला. बँक फोडण्याचा प्रयत्न झाल्याची माहिती मिळताच औंध पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.

प्राप्त माहितीच्या आधारे खबर्‍यांकडून माहिती घेवून तपासाची चक्रे फिरवली. घटनास्थळी काही पोलीस कर्मचारी व बँक कर्मचारी यांनी सुरक्षित ठेवलेला मुद्देमालाची खात्री केली. त्यांना 1 कोटी 95 लाख 90 हजार 441 रुपयांची रोख रक्कम व सोने चांदीच्या दागिण्यांचा मुद्देमाल सुरक्षित मिळून आला. यानंतर औंध पोलिस ठाण्याचे प्रभारी अधिकारी दत्तात्रय दराडे यांनी पोलिसांच्या तीन वेगवेगळया टिम बनवून सीसीटीव्ही व मोबाईल सी.डी.आरच्या तांत्रिक माहितीवरून दोन संशयीतांना गुन्ह्यात वापरण्यात आलेली चारचाकी (क्र. एम.एच.06 क्यू. 8888) सह सातारा येथून ताब्यात घेतले. तसेच एका आरोपीस वडगांव या गावातूनच ताब्यात घेतले. ही कारवाई पोलिस अधिक्षक अजयकुमार बन्सल, अप्पर पोलिस अधिक्षक अजित बोर्‍हाडे यांच्या सुचनेप्रमाणे व उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ.निलेश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि दत्तात्रय दराडे, पोलिस उपनिरीक्षक गंगाप्रसाद केंद्रे, राहुल सरतापे, राहुल जाधव, किरण हिरवे, महेश जाधव यांनी ही कारवाई केली.

Back to top button