सातार्‍यात सहा तास बत्ती ‘गुल’ | पुढारी

सातार्‍यात सहा तास बत्ती ‘गुल'

सातारा : पुढारी वृत्‍तसेवा महावितरणच्या भोंगळ कारभाराचा फटका सोमवारी सातारकरांना बसला. वारंवार वीजपुरवठा खंडीत होत असल्याने नागरिकांची गैरसोय होत होती. यावेळी नागरिकांनी महावितरणच्या राजवाडा येथील कार्यालयात याबाबत विचारपूस केली असता त्यांना उडवाउडवीची उत्तरे देण्यात आली. पावसामुळे गेल्या काही दिवसांपासून सातारा शहरात विजेचा लपंडाव सुरू आहे. महावितरणने या गोष्टीकडे गांभीर्याने लक्ष द्यावे, अशी मागणी होत आहे.

दुरुस्तीची कामे करुनही वीजपुरवठा होईना सुरु

उन्हाळ्यामध्ये महावितरणतर्फे धोकादायक झाडे, फांद्या हटवण्यात आल्या, डीपीच्या दुरूस्तीची कामे करण्यात आली, खराब लाईन बदलण्यात आले, पोल बदलण्यात आले अशी कामे केल्यानंतरही वीज पुरवठा सुरळीत होत नसल्याने नागरिक संतप्‍त आहेत. नागरिकांची गैरसोय होत असतानाच त्यावर कळस करून कर्मचारी उध्दट वागणूक ग्राहकांना देत आहेत. याचा मनस्ताप नागरिकांना होत आहे.

पाणी टाकीपर्यंत कसे पोहोचवायचे? गिरणी व लाँड्री व्यावसायिकही त्रस्त

वीज नसल्यामुळे इमारतीतील पाणी टाकीपर्यंत पोहोचवता येत नाही. परिणामी नागरिकांना पाणी टंचाईला तोंड द्यावे लागते. पिण्याचे पाणी व लहान-मोठे व्यवसाय बंद पडल्याने रहिवासी वैतागले आहेत. मोठ्या इमारती व कार्यालयामध्ये नागरिकांना लिफ्टसाठी जनरेटर सुरू करावे लागतात. सलग वीज खंडित असल्याने इन्व्हर्टर उपयुक्त ठरत नाही. गिरणी व लाँड्री व्यवसायिकदेखील दिवसातून दोन तीन वेळा बत्ती गुल होत असल्यामुळे त्रस्त आहेत.

Back to top button