सातारा : आज घेणार मैत्रीच्या आणाभाका | पुढारी

सातारा : आज घेणार मैत्रीच्या आणाभाका

सातारा : पुढारी वृत्तसेवा ऑगस्ट महिन्यातील पहिला रविवार फ्रेंडशिप डे म्हणून साजरा केला जात असल्याने या अनेक मैत्रीवेड्यांकडून फ्रेंडशिप बॅण्ड बांधून मैत्रीच्या आणाभाका घेतल्या जाणार आहेत. नुकतीच महाविद्यालये सुरु झाल्याने नवनवीन मित्र-मैत्रिणी झाल्या आहेत. या मैत्रीच्या ग्रॅण्ड सेलीब्रेशनसाठी होणार्‍या नियोजनातून फ्रेंडशिप डेचा सळसळता उत्साह तरुणाईमध्ये पहायला मिळत आहे. सहल, पार्टीबरोबरच काही सामाजिक उपक्रमांचेही आयोजन करण्यात आले आहे.

सध्याच्या सोशल मीडियाच्या जमान्यात प्रत्येेकक्षण साजरा करण्याचे फॅड वाढले आहे. त्यामुळे फ्रेंडशिप डेचे महत्त्वही वाढले आहे. दरवर्षी ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या रविवारी फ्रेंडशिप डे मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. विशेषत: तरुणाई यामध्ये अग्रेसर असतेे. त्यातच महाविद्यालयांचे नवीन शैक्षणिक वर्ष नुकतेच सुरु झाल्याने नव्याने महाविद्यालयीन विश्‍वात प्रवेशित झालेल्यांना नवनवीन मित्र-मैत्रिणी मिळाल्या आहेत. नव्याने ओळख झाली असली तरी या ओळखीचे मैत्रीत रुपांतर होण्यास या फ्रेंडशिप डेेचे उत्तम व्यासपीठ मिळणार आहे. त्यामुळे तरुणाई फ्रेंडशिप डेचा सळसळता उत्साह पहायला मिळत आहे. ही तरुणाई रविवारी या मैत्रीचे ग्रॅण्ड सेलीब्रेशन करण्यासाठी सज्ज झाले आहेत. अनेकजण आपल्या मित्र-मैत्रिणींना फ्रेंडशिप बॅण्ड बांधून मैत्रीच्या आणाभाका घेणार आहेत. अनेक मैत्री ग्रुपनी पर्यटन सहलींचे तर काही सामाजिकजाणीवा जपणार्‍या तरुणाईने विधायक उपक्रमांचेही आयोजन केले आहे.

दरम्यान, संपूर्ण जगभरात विविध देशांत विविध दिवशी ‘फ्रेंडशिप डे’ साजरा केला जात असल्याने बाजारपेठेतही या साजरीकरणातून मोठी उलाढाल होत आहे. सातारा शहरातील बाजारपेठेत सॅटीन, रबर, रेडीअमइफेक्टचे तसेच अ‍ॅक्रॅलिक धातूची, मोती व वेगवेगळ्या मण्यांचे असे विविध प्रकारचे फ्रेंडशीप बॅण्ड विक्रीसाठी आले आहेत. तर अनेक मित्र-मैत्रिणी आपल्या मैत्रीदिनाची आठवण कायमस्वरुपी आपल्या जवळ राहील अशा वस्तू किंवा गिफ्टही एकमेकांना देतात. या पार्श्‍वभूमीवर बेस्ट फ्रेंडच्या ब्रॅण्डनेमसह अनेक गिफ्ट, चॉकलेटचे विविध प्रकार व पॅकेज बाजारपेठेत विक्रीसाठी आले असून तरुणाईकडून त्याची मोठ्या प्रमाणावर खरेदी केली जात आहे.

Back to top button