सातारा : डेंग्यूचे 106 तर चिकुनगुनियाचे 29 रुग्ण | पुढारी

सातारा : डेंग्यूचे 106 तर चिकुनगुनियाचे 29 रुग्ण

सातारा : पुढारी वृत्तसेवा वातावरणात होत असलेल्या बदलामुळे सातारा जिल्ह्यात किटकजन्य आजाराने डोके वर काढले आहे. गेल्या काही दिवसांपासून डेंग्यू व चिकुनगुनियाचे रूग्ण वाढू लागले आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत डेंग्यूचे 106 तर चिकुनगुनियाचे 29 रूग्ण सापडले असून जिल्हा आरोग्य यंत्रणा अलर्ट झाली आहे. त्यातच गेल्या 8 दिवसांपासून डेंग्यू व हिवताप संशयित रूग्णांचे नमुने तपासणीविना पडून आहेत.

सध्या पावसाळ्याचे दिवस सुरू आहेत. त्यामुळे किटकजन्य आजारांचा फैलाव वाढू लागला आहे. कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव कमी झाला असला तरी इतर आजारांनी डोके वर काढले आहे. स्वाईन फ्ल्यूचेही 8 रूग्ण जिल्ह्यात आढळले आहेत. त्यातच डेंग्यू व चिकुनगुनियाचे रुग्ण ठिकठिकाणी सापडू लागले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा खडबडून जागी झाली आहे. डेंग्यूच्या रुग्णांची संख्या झपाट्याने वाढू लागली आहे.

सर्व कार्यक्षेत्रात आरोग्य विभागामार्फत जनजागृती करण्यात येणार आहे. घरात किंवा घराच्या टेरेसवर सामान उघड्यावर फेकू नये, पाणी साठवलेल्या भांड्यांचे झाकण घट्ट बसवावे. नगरपालिका, नगरपंचायत, ग्रामपंचायत मार्फत त्वररित धूर फवारणी करण्यात यावी. प्रशासनामार्फत सार्वजनिक ठिकाणच्या भंगार व अन्य साहित्यांची विल्हेवाट लावावी. ज्या ठिकाणी भंगार साहित्य आढळल्यास अशा घरमालकांना तात्काळ नोटीस बजावण्यात येणार आहे. दरम्यान, डेंग्यू व मलेरियाच्या संशयित रुग्णांचे नमुने गेल्या 8 दिवसांपासून प्रयोगशाळेत तपासणीविना प्रलंबित आहेत. त्यासाठी आरोग्य विभागाची वरिष्ठ अधिकार्‍यांनी तात्काळ लक्ष देवून कार्यवाही करावी, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.

सातारा तालुक्यात डेंग्युचे सर्वाधिक रुग्ण

सध्या जावली तालुक्यात 1, कराड 12, खंडाळा 1, खटाव 9, कोरेगाव 11, पाटण 1, सातारा 68, वाई 2, असे एकूण 106 डेग्यूचे रुग्ण आहेत. तर चिकुनगुनियाचे खटाव तालुक्यात 12, माण 6, कुडाळ 5, राजाळे 4, पुसेगाव 2 असे 29 रूग्ण आढळून आले आहेत. डेंग्यू व चिकुनगुनियाचे रुग्ण जिल्ह्यात आढळले असल्याने आरोग्य विभागामार्फत योग्य उपाययोजना राबवण्यावर भर दिला आहे.

Back to top button