आंबेनळी घाटात अपघात : चौघे जखमी | पुढारी

आंबेनळी घाटात अपघात : चौघे जखमी

प्रतापगड : पुढारी वृत्तसेवा आंबेनळी घाटातील मेटतळे येथील वळणावर दोन कारची समोरासमोर जोराची धडक होवून भिषण अपघात झाला. या अपघातामध्ये चौघेजण जखमी झाले असून दोन्ही कारचे मोठे नुकसान झाले आहे. राजीवकुमार भगत, सौ. अनिता भगत, प्रिती भगत (तिघे रा. हडपसर, पुणे) व ज्योती पवन दिक्षीत (रा. गोरेगाव मुंबई) अशी जखमींची नावे आहेत.

याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, राजीवकुमार भगत हे इटीओस कारमधून महाबळेश्‍वरहून प्रतापगडकडे निघाले होते. तर होंडा सिटीमधून दिक्षीत कुटुंबिय प्रतापगडहून महाबळेश्‍वरकडे निघाली होती. या दोन्ही कार आंबेनळी घाटातील मेटतळे गावाच्या हद्दीतील एका वळणावर आल्या असता होडा सिटी कारचालकाचा कारवरील ताबा सुटल्याने ती कार समोरुन आलेल्या इटीओस कारवर जावून धडकली. हा अपघात शनिवारी दुपारी 1 वाजण्याच्या सुमारास झाला.

यामध्ये चौघेजण जखमी झाले आहेत. या अपघाताची माहिती मिळताच महाबळेश्‍वर पोलिस ठाण्याचे सपोनि पावरा यांनी घटनास्थळी भेट देवून जखमींना तात्काळ महाबळेश्‍वर येथे उपचारासाठी पाठवले. महाबळेश्‍वर येथे प्राथमिक उपचार करुन जखमींना पुढील उपचारासाठी सातारा येथे पाठवण्यात आले आहे. या अपघाताची फिर्याद जितेंद्र पुंजाराम ठाकूर यांनी दिली असून पुढील तपास सपोनि पावरा करत आहेत.

Back to top button