सातारा : पाचुपतेवाडीजवळील पूल धोकादायक | पुढारी

सातारा : पाचुपतेवाडीजवळील पूल धोकादायक

ढेबेवाडी ः पुढारी वृत्तसेवा मालदन – पाचुपतेवाडी मार्गावरील पूल भराव वाहून गेल्याने धोकादायक बनला आहे. वास्तविक सन 2019 पासून अशीच परिस्थिती असून आता पुलालगतच्या भिंतीस तडे गेले आहेत. त्याचबरोबर या संपूर्ण मार्गावर खड्ड्यांचे साम्राज्य असूनही चार वर्षापासून सातत्याने दुर्लक्ष केले जात आहे. त्यामुळेच प्रशासनासह बांधकाम खात्याला केव्हा जाग येणार ? असा प्रश्‍न उपस्थित होत आहे. स्व. विलासराव पाटील यांच्या निधीतून 25 ते 30 वर्षापूर्वी या रस्त्याचे खडीकरण व मजबुतीकरण करण्यात आले होते. त्यांनतर प्रत्येक पाच वर्षांनी हा रस्ता डांबरीकरण झाला.

मात्र ते एक वर्षापेक्षा जास्त काळ कधीच टिकला नाही, हेच या रस्त्याचे दुर्दैव आहे. सन 2017 – 2018 मध्ये या रस्त्याच्या खडीकरण, डांबरीकरणासाठी 30 लाख रूपये मंजूर झाले. यावेळी वापरलेला मुरूम, खडी व निकृष्ट दर्जाचे डांबराबाबत या तक्रारी होत्या. तत्कालीन पंचायत समिती सदस्या सुनंदा पाटील यांनी याविरोधात पंचायत समिती सभेतही या विषयावर चर्चा घडवून आणली होती. सन 2019 मध्ये पहिल्याच पावसाळ्यात झालेल्या अतिवृष्टीत हा मार्ग अक्षरशः उद्धवस्त झाला होता. या मार्गावर पाईप पुलाजवळ सन 2019-2020 मध्ये रस्त्यातच खड्डा पडला होता आणि ओढ्याच्या बाजूने पुलाचा भराव वाहून गेला होता. त्यामुळे पुलासाठी केेलेले बांधकाम खचून भिंतीला तडे गेले होते.

मात्र त्यानंतरही साधी डागडुजीही झाली नव्हती. त्यातच मागील वर्षी जुलै महिन्यात झालेली अतिवृष्टी आणि यावर्षी झालेल्या पावसामुळे दोन ते तीन फूट रूंद, सहा ते सात फूट लांब आणि आठ फुटापेक्षा जास्त खोल खड्डा पडून रस्त्यावरील पाणी खड्ड्यातून ओढ्यात जात आहे. त्यामुळेच पुलाच्या पायालगतचा भाग पूर्णपणे वाहून जात पुलालगतच्या भिंतीला तडे गेले आहेत. पुलावरील खड्ड्यालगत गवत उगवले असून खड्डाच दिसत नाही. त्यामुळेच या ठिकाणी निष्पाप नागरिकांचा बळी गेल्यावरच बांधकाम विभाग जागा होणार का? असा प्रश्‍न उपस्थित होत आहे.

Back to top button