महिला आरक्षणामुळे इच्छुकांची झाली राजकीय गोची..!

महिला आरक्षणामुळे इच्छुकांची झाली राजकीय गोची..!
Published on
Updated on

पाटण : गणेशचंद्र पिसाळ म्हावशी जिल्हा परिषद गटामध्ये पाटणकर गटाचे पारंपारिक बालेकिल्ले आहेत. चाफळ पं. स. गणात नेहमीच काटे की टक्कर पाहायला मिळते. यावेळी म्हावशी जि.प. व पं.स.या दोन्ही ठिकाणी सर्वसाधारण महिला आरक्षण आल्याने अनेक इच्छुकांची राजकीय गोची झाली आहे. चाफळ पं.स. गण सर्वसाधारणसाठी खुला झाल्याने काठावरच्या जय पराजयात येथे पाटणकर -देसाई दोन्ही गटांकडून मातब्बर निवडणूक रिंगणात असतील यात शंकाच नाही.

म्हावशी जि. प. सह म्हावशी व चाफळ पं. स. हे दोन्ही मतदारसंघ माजी मंत्री विक्रमसिंह पाटणकर व राष्ट्रवादीचे नेते सत्यजितसिंह पाटणकर यांच्या पाटणकर गटासाठी अनुकूल असल्याची चर्चा आहे. तथापि चाफळ गणासाठी यावेळी सर्वतोपरी ताकत लावून तो गण आपल्याकडे खेचून आणण्यासाठी माजी गृहराज्यमंत्री आ. शंभूराज देसाई गटाकडून कमालीचे प्रयत्न होणार यात शंकाच नाही.
गतवेळच्या निवडणुकीत या तिन्ही मतदारसंघात पाटणकर गटाने बाजी मारली. त्यावेळी म्हावशी जि. प. सर्वसाधारण तर पं. स. इतर मागासवर्गीय महिला व चाफळ पं.स. सर्वसाधारण महिलेसाठी राखीव होता. पाटणकर गटाने अनुभवी राजेश पवार यांना जि.प.ची उमेदवारी दिली. चाफळ मतदारसंघात जि. प. उमेदवारी दिल्याने त्याचा स्थानिक पं.स.मतदारसंघावर सकारात्मक परिणाम झाला. सौ. रूपाली पवार विजयी झाल्या. म्हावशी पं. स. या मूळ पाटणकर गटाच्या बालेकिल्ल्यात सौ. उज्ज्वला लोहार विजयी झाल्या होत्या. राजेश पवार यांना जिल्हा परिषद शिक्षण व अर्थ समिती सभापती पद मिळाल्याने याचाही सकारात्मक परिणाम यावेळच्या निवडणुकीत पहायला मिळणार आहे.

म्हावशी जि.प.व पं. स. मतदारसंघ हा पाटणकर गटासाठी अतिशय अनुकूल असला तरी चाफळ पं.स. गण व पुनर्रचना याचा विचार करता यावेळीही येथे सर्वसक्षम उमेदवार देऊन मागच्याप्रमाणेच पाटणकर गटाला अभ्यासपूर्वक खेळी करावी लागणार आहे. आ. देसाई गटाकडे यावेळीही सक्षम उमेदवार तयारीत आहेत. जि. प. महिलेसाठी गेल्याने चाफळ पं.स. साठी स्पर्धा होणार असून हा गण पाटणकर व देसाई गटासाठी कळीचा मुद्दा ठरणार आहे . पंचायत समिती सत्ता टिकवणे अथवा मिळवण्यासाठी या गणात दोन्ही बाजूंनी सार्वत्रिक ताकद लावली जाणार आहे.

म्हावशी जि.प. व पं.स. मतदारसंघ पाटणकर गटासाठी अनुकूल असतोच. चाफळ पं.स. गणांतर्गत गेल्या पाच वर्षातील राजकीय-सामाजिक बदल, ग्रामपंचायत, विकास सोसायट्यांसह अन्य निवडणुका, विरोधात झालेले पक्षप्रवेश, अंतर्गत नाराजी याचाही विचार तितकाच क्रमप्राप्त आहे. येथे उमेदवार निवड करताना पाटणकर गटाला अतिशय चाणाक्षपणे ही प्रक्रिया पार पाडावी लागणार आहे. मुळातच या मतदारसंघात काही गमवायचे नसल्याने कमवण्याच्या जिद्दीपोट्टी आ. देसाई गटाकडून कमालीचे प्रयत्न होणार आहेत.
चाफळ मतदारसंघात अटीतटीची लढत होऊन काठावरच्या जय पराजयात पंचायत समिती सत्तेची सूत्रे दडली आहेत .

'सौ'साठी 'श्रीं'ची धावाधाव ..

पाटणकर गटाचा हुकुमी बालेकिल्ला असलेल्या म्हावशी जिल्हा परिषद व पंचायत समिती मतदारसंघासाठी तब्बल पाच वर्षे अनेक मातब्बर आजी, माजी पदाधिकारी व कार्यकर्ते उमेदवारीसाठी गुडघ्याला बाशिंग बांधून तयार होते. ऐनवेळी मात्र येथे या दोन्ही ठिकाणी सर्वसाधारण महिला आरक्षण पडल्याने अनेक नवरोबांचा भ्रमनिरास झाला आहे. यातूनही प्रचंड इच्छाशक्तीच्या जोरावर काही 'श्रीं ' नी आता आपापल्या 'सौं ' साठी नेत्यांपुढे पदर पसरण्याची तयारी ठेवली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news