कराड येथे उड्डाणपुलाचे काम सुरू करा | पुढारी

कराड येथे उड्डाणपुलाचे काम सुरू करा

कराड : पुढारी वृत्तसेवा शिरवळ, वेळे, पारगाव येथे उड्डाणपूल उभारावा, महामार्गाच्या सहापदरीकरण कामाला गती द्यावी, पाटण शहराजवळील पुलाचे काम पूर्ण करावे. सातारा ते कागल मार्गाच्या सहापदरीकरण कामाला तसेच कराड शहराच्या कोल्हापूर नाक्यावरील अतिरिक्त उड्डाणपुलाच्या बांधकामाला गती देण्यात यावी, अशी मागणी खासदार श्रीनिवास पाटील यांनी महामार्गांच्या प्रश्नाबाबत दिल्ली येथे झालेल्या बैठकीत केली.

नवी दिल्ली येथे केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्र राज्यातील राष्ट्रीय महामार्गांच्या प्रश्नांबाबत आढावा बैठक बोलावण्यात आली होती. बैठकीसाठी श्री.छ.खा.उदयनराजे भोसले, खा.डॉ.अमोल कोल्हे, खा.रणजीतसिंह निंबाळकर, खा.धैर्यशील माने, खा.श्रीकांत शिंदे, खा.संजय मंडलीक, खा.सुजय विखे यांच्यासह खासदार उपस्थिती होते. खा.श्रीनिवास पाटील म्हणाले, माझ्या सातारा लोकसभा मतदारसंघातून जाणार्‍या राष्ट्रीय महामार्गाबाबत अनेक तक्रारी येत असून त्याचा निपटारा होणे आवश्यक आहे. सातारा ते कागल मार्गाच्या सहापदरीकरण कामाला तसेच कराड शहराच्या कोल्हापूर नाक्यावरील अतिरिक्त उड्डाणपुलाच्या बांधकामाला गती देण्यात यावी. उंब्रज शहरानजीक तारळी नदीवरील पूल ओलांडल्यानंतर कराड ते उंब्रजकडे जाताना रस्त्यावर धोकादायक वळण आहे. ते वळण काढून रस्ता अधिक सुरक्षित करण्याची गरज आहे असल्याचे त्यांनी निदर्शनास आणून दिले.
राष्ट्रीय महामार्गांच्या लगतच्या भुयारी मार्गांवर पाणी साचल्याच्या तक्रारी आहेत.

संपूर्ण पावसाळ्यात ही समस्या कायम राहिल्याने तुंबलेल्या अंडरपास मार्गातून रस्ता ओलांडणे कठीण होते. त्यामुळे अद्याप पावसाळा सुरू असल्यामुळे संबंधित अधिका-यांनी प्रत्यक्ष जागेवर जाऊन वस्तुस्थिती पहावी. ती समस्या कायमस्वरूपी निकाली निघण्यासाठी कार्यवाही करावी. महामार्गावरील वेळे (ता.वाई) येथील ठिकाण गंभीर अपघातस्थळ म्हणून ओळखले जाऊ लागले आहे. याठिकाणी उड्डाणपुलाची नितांत गरज आहे. खंडाळा तालुक्यातील पारगाव येथे देखील उड्डाणपुल होणे गरजेचे आहे. शिरवळ औद्योगिक क्षेत्राची व्याप्ती दिवसेंदिवस वाढत आहे. येथे उड्डाणपूल नसल्याने औद्योगिक क्षेत्रात येण्यासाठी अवजड वाहनांना 4 ते 5 किलोमीटर जादा प्रवास करून मागे वळावे लागते. त्यामुळे प्रामुख्याने याठिकाणी उड्डाणपुलाची गरज असून तो बांधण्यात यावा. शिरवळ परिसरातील सर्व्हिस रोड लगतच्या नाल्यांचे कामही तातडीने पूर्ण करण्यात यावे. राज्य महामार्गासह प्रमुख जिल्हा मार्ग आणि इतर जिल्हा मार्गावर हाय मास्ट दिवे बसवण्यात यावेत.

कराड-चिपळूण राज्यामार्गाचे काम अर्धवट स्थितीत आहे. मल्हारपेठ, नाडे, आडूळ आणि म्हावशी जवळ काही भागाचे काम अपूर्ण राहिले असून ते पूर्ण करणे आवश्यक आहे. तसेच पाटण ते हेळवाकपर्यंतचे उर्वरित काम पूर्णत्वास नेण्यात यावे. कराड-चिपळूण राज्यमार्गाच्या सुधारित कामामुळे रत्त्याचे काम पूर्ण झालेल्या भागात रस्त्याची उंची 3 ते 4 फुटांनी वाढली आहे. त्यामुळे राज्यामार्गाला जोडणा-या मार्गावर उंचवटा तयार झाला आहे. परिणामी लगतच्या गावांकडे जाणारे मार्ग आणि बाहेर जाण्याचे मार्ग अत्यंत खडतर बनले आहेत. त्यामुळे त्या ठिकाणी अपघातांचे प्रमाण वाढले आहेत. सदर मार्गावरील सर्व ठिकाणचे स्पॉट दुरुस्त करणे आवश्यक असल्याची सूचना त्यांनी केली. तर कराड -चिपळूण मार्गावरील पाटण शहराजवळ केरा नदीवरील पूलाचे तातडीने पूर्ण करावे अशी मागणी केली.

सुर्ली घाटात रूंदीकरणाचे काम सुरू करा..

कराड-विटा मार्गावरील सुर्ली घाटातील रस्त्याच्या रुंदीकरणासाठी वन विभागाने परवानगी दिली आहे. त्यामुळे हे काम देखील तातडीने हाती घेण्यात यावे. तसेच वडगाव हवेली (ता.कराड) जवळील राष्ट्रीय महामार्ग भागातील नाल्यांची उंची 2 फुटांनी वाढली असल्यामुळे परिसरात मोठ्या प्रमाणात पाणी साचले जात आहे. त्यासंदर्भातही काम हाती घ्यावे, अशी सूचनाही खा. श्रीनिवास पाटील यांनी मांडली.

हेही वाचा

Back to top button