वाढे उड्डाणपुलाखाली कचर्‍याची बजबजपुरी | पुढारी

वाढे उड्डाणपुलाखाली कचर्‍याची बजबजपुरी

खेड : पुढारी वृत्तसेवा सातारा शहराचे प्रवेशद्वार असलेल्या वाढे चौकातील उड्डाणपुलाखाली ठिकठिकाणी मोठ्या प्रमाणावर कचर्‍याचे ढीग लागल्याने घाणीचे साम्राज्य पसरले आहे. त्यामुळे परिसरात दुर्गंधी निर्माण होऊन प्रवासी व नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. चौकातील हॉटेल व इतर व्यावसायिक या ठिकाणी कचरा टाकत असल्याचे दिसून येत आहे. कचर्‍यामुळे स्थानिक नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले असून पुलाखाली कचरा टाकणार्‍यांवर कारवाई करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.

सातारा – लोणंद मार्गावरील वाढे चौक सध्या झपाट्याने विस्तारत असून विकसित होणार्‍या या परिसरात नागरी वस्ती वाढत आहे. चौकात हाँटेल, चहा टपरीवाले व इतर व्यावसायिकांनी जाळे पसरले आहे. सातारा शहराच्या हद्दवाढीत या भागाचा नव्याने समावेश झाला असून येथील चौकाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. चौकातील पुणे – बंगलोर महामार्गावर उभारलेल्या उड्डाणपुलाखाली सध्या बकाल अवस्था निर्माण झाली आहे. पुलाखाली बॅरिगेटस्लगत मोठ्या प्रमाणावर कचर्‍याचे ढीग लागले आहेत. या कचर्‍यावर मोकाट कुत्री, जनावरे फिरत असल्याने कचरा विस्कटला जात आहे. सध्या पाऊस पडत असल्याने कचर्‍यामध्ये मोठ्या प्रमाणावर पाणी साचून परिसरात दुर्गंधी पसरली आहे. नगरपालिका व महामार्गाच्या देखभाल, दुरुस्ती विभागाचे या भागात दुर्लक्ष असल्याने परिसरातील हॉटेल व इतर व्यावसायिक तसेच रस्त्यावरुन येणारे – जाणारे नागरिक कचरा टाकत असल्याचे दिसून येत आहे.

विशेषतः हॉटेल व्यावसायिक या ठिकाणी शिल्लक अन्न पदार्थ, प्लॅस्टिक चहाचे कप टाकत आहेत. तर केशकर्तनालयातील केसांचाही येथे ढीग साचला असून रस्त्यावर संध्याकाळी मासे, खेकडे विक्रीसाठी बसणारे कातकरी या ठिकाणी शिल्लक राहिलेला माल टाकून पसार होत आहेत. कचर्‍याच्या साम्राज्यामुळे या मार्गावरून ये -जा करणार्‍या पादचारी वाहनचालकांना नाक मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. तर दुर्गंधीमुळे परिसरातील नागरिकांचे आरोग्य ऐरणीवर आले आहे. वाढे चौक परिसर कायमस्वरूपी कचरामुक्त करण्यासाठी या ठिकाणी नगरपालिका व महामार्ग देखभाल दुरुस्ती विभागाने फलक लावावेत, पालिकेने नियमित घंटागाडीची व्यवस्था करणे गरजेचे असून कचरा टाकणार्‍यांवर कारवाई करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. साचलेल्या दुर्गंधीयुक्त कचर्‍याची तातडीने विल्हेवाट लावावी अन्यथा आंदोलन छेडण्याचा इशारा नागरिकांनी दिला आहे.

दुर्गंधी नागरिकांच्या आरोग्याच्या मुळावर

वाढे चौकातील उड्डाणपुलाखाली साचलेल्या कचर्‍यालगतच आडोशाला काहींनी सुलभ शौचालय केले आहे. त्यामुळे परिसरात पसरणारी दुर्गंधी आरोग्याच्या मुळावर उठणारी आहे. कचर्‍याचे साम्राज्य, उघड्यावर मुतारी यामुळे चौकाला विद्रूप स्वरूप प्राप्त झाले आहे. नगरपालिकेच्या वतीने वाढे चौक व बाँम्बे रेस्टॉरंट चौकातील उड्डाणपुलाखाली सुशोभीकरण करण्याचा प्रस्ताव आहे. त्यासाठी निधीचीही तरतूद केल्याचे बोलले जात आहे. परंतु अद्याप यावर कोणतीही कार्यवाही नसल्याने चौकातील बकाल स्वरूप केव्हा बदलणार? असा सवाल नागरिकांमधून उपस्थित केला जात आहे.

Back to top button