विरोधी पक्ष संपवण्याचा भाजपचा कार्यक्रम | पुढारी

विरोधी पक्ष संपवण्याचा भाजपचा कार्यक्रम

सातारा : पुढारी वृत्तसेवा भाजपने देशात विरोधी पक्ष संपवण्याचा एक कलमी कार्यक्रम सुरू आहे. भविष्यात त्यांना देशात विरोधी पक्षाचे अस्तित्वच ठेवायचे नसून फक्त भाजपा हाच देशाचा कारभार करू शकतो असा त्यांचा कार्यक्रम ठरला आहे. त्यामुळे काँग्रेसने भाजपच्या या धोरणाला विरोध करायचा आहे तरच देश अखंड राहिल, असे मत आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्‍त केले. सातारा जिल्हा काँग्रेस कमिटीमध्ये आयोजित बैठकीत ते बोलत होते. यावेळी जिल्हाध्यक्ष डॉ. सुरेश जाधव, महिलाध्यक्षा अल्पना यादव, ओबीसी सेलचे प्रदेशाध्यक्ष भानुदास माळी, प्रदेश सचिव राजेंद्र शेलार, अ‍ॅड. विजयराव कणसे, जिल्हा सरचिटणीस नरेश देसाई, अजित पाटील-चिखलीकर, महिला प्रदेश सचिव धनश्री महाडिक, मनोहर शिंदे, निवास थोरात उपस्थित होते.

आ. चव्हाण म्हणाले, भविष्यात देशात एकच पक्ष, त्यांचाच पंतप्रधान आणि राष्ट्रपती हे धोरण राबवायचे आहे. त्यामुळे त्यांच्या या भूमिकेला आव्हान देण्यासाठी काँग्रेस कार्यकर्त्यांनी तयार राहणे गरजेचे आहे तरच देशातील लोकशाही टिकेल. स्वातंत्र्यपूर्व व स्वातंत्र्य व स्वातंत्र्यप्राप्तीनंतर काँग्रेसचे फार मोठे योगदान आहे या योगदानाबाबत भाजप जनतेत संभ्रमावस्था निर्माण करून काँग्रेसला बदनाम करण्याचे काम करत आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी कार्यकर्त्यांनी सज्ज रहावे. पक्षाच्या आजादी का गौरव यात्रेत कार्यकर्त्यांनी सहभाग घेवून यशस्वी करावी, असे आवाहनही आ. चव्हाण यांनी केले. यावेळी अल्पसंख्यांक जिल्हाध्यक्ष झाकीर पठाण, शहराध्यक्ष रजनीताई पवार, बाबासाहेब कदम, अन्वरपाशा खान, श्रीकांत चव्हाण, संदीप चव्हाण, अ‍ॅड. दत्तात्रय धनवडे, विराज शिंदे, मनीषा पाटील, रजिया शेख, मालनताई परळकर, कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.

Back to top button