एक महिना..तीन ठाणी.. मोबाईल रिकव्हरीचा पाऊस | पुढारी

एक महिना..तीन ठाणी.. मोबाईल रिकव्हरीचा पाऊस

सातारा: विठ्ठल हेंद्रे सायबर पोलिस ठाण्याकडून नुकताच चोरी झालेल्या मोबाईल जप्‍तीचा स्पेशल ड्राईव्ह राबवला असता अवघ्या एकाच महिन्यात 83 मोबाईल रिकव्हरीचा पाऊस पाडला. गहाळ झालेले हे मोबाईल सातारा, शाहूपुरी व तालुका पोलिसांकडून परत नागरिकांना मिळाल्यानंतर त्यांनी पोलिसांना सॅल्युट ठोकला. दरम्यान, चोरीचे मोबाईल घेणार्‍यांवर लवकरच गुन्हे दाखल करणार असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.

लहानांपासून ज्येष्ठांपर्यंत किमान 10 हजार रुपयांपासूनचे पुढे अ‍ॅन्ड्रॉईड मोबाईल सर्रास वापरले जातात. याच मोबाईलची गेल्या काही वर्षांपासून चोरी वाढली आहे. मोबाईल चोरीचे सर्वाधिक सॉफ्ट टार्गेट म्हणजे मंडई, गर्दीच्या जागा, प्रवास, मोबाईल चार्जिंगची ठिकाणे आहेत. यामुळे मोबाईलवर डल्‍ला मारण्यासाठी चोरटे या ठिकाणी सर्वाधिक सक्रीय असतात. प्रामुख्याने 25 हजार रुपयांपासून ते 1 लाख रुपये पर्यंतचे चोरीसाठी हेरल्यानंतर तो निम्म्याहून अधिक किंमतीला सहज विकला जातो. कमी कमीत चांगला मोबाईल मिळत असल्याने घेणाराही मागे पुढे पाहत नाही व खरेदी करतो. विना पावतीचा मोबाईल कोणाकडूनही घेणे कायदेशीर गुन्हा ठरणारी बाब आहे. मात्र चोरटे मोबाईल विक्री करताना नामी शक्‍कल वापरतात.

यामध्ये आई आजारी, ईमर्जन्सी मेडीकलसाठी पैसे लागणार आहेत, कर्जाचा हप्‍ता थटला आहे अशी गोलगोल कारणे देवून कमी किंमतीमध्ये मोबाईल गळ्यात मारतात. पुढे या मोबाईलमध्ये सिम कार्ड टाकल्यानंतर तांत्रिक तपासाद्वारे पोलिस संपर्क साधतात व मोबाईल चोरीचा विकत घेतल्याचे समोर येते. दरम्यान, पोलिस अधीक्षक अजयकुमार बन्सल यांनी मोबाईल चोरट्यांचा बंदोबस्त करुन सर्वसामान्य नागरिकांना त्यांचे मोबाईल परत मिळावेत यासाठी सायबर पोलिसांना सांगितले. त्यानुसार नव्यानेच नियुक्‍त झालेले पोनि सुनील शेळके यांनी पोलिस हवालदार अजय जाधव, अमित झेंडे यांनी प्रभावी अंमलबजावणी करत चोरीचे मोबाईल जप्‍त करण्याचा झपाटा लावला.

दोन वर्षे..तीन ठाणी..400 मोबाईल

सायबर पोलिसांनी चोरी झालेले मोबाईल जप्‍त करण्यासाठी तीन पोलिस ठाणी निवडली. याठिकाणाहून गहाळ दाखल असलेल्या मोबाईलचा डाटा मागवण्यात आला असता सुमारे 400 मोबाईल गेल्याचे समोर आले. तांत्रिक तपास केल्यानंतर त्या मोबाईल मधील सिमकार्ड सध्या कोणाच्या नावावर आहे हे तपासून त्याला सायबर पोलिस ठाण्यात बोलवले. पोलिसांनी मोबाईलबाबत विचारणा करताच अमुक-तमुक कारण देवून एकाने कमी किंमतीमध्ये मोबाईल गळ्यात मारल्याचे बहुतांशी जणांकडून समोर आले आहे. ही सर्व प्रक्रिया एका महिन्यात राबवण्यात आली आहे.

कर्नाटक, नागपूर, नांदेडपर्यंत चोरीचे मोबाईल

सायबर पोलिसांनी जप्‍त केलेले 83 मोबाईल कर्नाटक राज्यापासून नागपूर, नांदेडस महाराष्ट्रातील बहुतांशी जिल्ह्यातून आणले आहेत. चोरीचे मोबाईल वापरणार्‍यांना पोलिसी भाषेत सांगितल्यानंतर बहुतेकांनी सायबर पोलिस ठाण्यात मोबाईल आणून दिले व ज्यांना शक्य नाही त्यांनी कुरिअरने मोबाईल पाठवल्याचे समोर आले आहे. दरम्यान, मोबाईल चोरी केल्यानंतर चोरटे 3 ते 5 महिने मोबाईल विकत नाहीत. त्यानंतर मात्र बाहेरील जिल्ह्यात जावून ते मोबाईल विकले जात असल्याचे समोर आले आहे.

आयएमईआय, एसडीआर अन् सीडीआर

चोरी झालेले मोबाईल तांत्रिक तपासावरच सापडतात. यासाठी मोबाईल वापरणार्‍या प्रत्येकाने मोबाईल विकत घेताना त्याची पावती जपून ठेवणे क्रमप्राप्‍त आहे. मोबाईल पावतीवर मोबाईलचा युनिक कोड अर्थात आयएमईआय नंबरसह इतर महत्वाची असते. मोबाईल चोरी होताच चोरटे त्यातील सिम कार्ड काढून फेकून देतात. नव्याने त्यामध्ये सिम कार्ड टाकल्यानंतर मात्र तांत्रिक प्रकियेद्वारे सध्या त्यात कोणाच्या नावचे सिम आहे हे एसडीआर काढल्यानंतर समोर येते. दरम्यान, गहाळ अर्ज तक्रारदार यांनी योग्य न भरल्याने सुमारे 5 मोबाईलचे ट्रेस लागत नव्हता. यामुळे पोलिसांनी सीडीआर काढून मूळ मोबाईल धारकांपर्यंत पोहचण्याची किमया साधली आहे.

आता जिल्हाभर मोबाईल जप्‍तीचा ड्राईव्ह राबवला जाणार असून तसे प्लॅनिंग करण्यात आले आहे. यासाठी प्रत्येक पोलिस ठाण्यातील एका कर्मचार्‍याला ट्रेनिंग दिले जात आहे. बिगर पावतीचा जुना मोबाईल घेवून तो वापरणे हे बेकायदेशीर आहे. भविष्यात याप्रकरणी गुन्हे
दाखल करणार आहे.
– पोनि सुनील शेळके

Back to top button