जिल्ह्यात स्वाईन फ्लूचे तीन रुग्ण | पुढारी

जिल्ह्यात स्वाईन फ्लूचे तीन रुग्ण

सातारा: पुढारी वृत्तसेवा जिल्ह्यात कोरोनानंतर आता स्वाईन फ्लूने डोके वर काढण्यास सुरुवात केली आहे. आरोग्य यंत्रणेने चार दिवसांमध्ये सात संशयित रुग्णांचे नमुने घेऊन ते पुण्यातील एनआयव्ही लॅबला पाठवले होते. त्यामध्ये तिघांना स्वाईन फ्लू झाल्याचे समोर आले आहे. त्यामुळे सातारकरांना धास्ती लागून राहिली आहे. या पार्श्‍वभूमीवर आरोग्य विभाग अलर्ट झाला आहे. कोरोनाची चौथी लाट ओसरली नसतानाच स्वाईन फ्लूूची एंट्री झाल्याने आरोग्य विभागाची डोकेदुखी वाढली आहे. सध्या पावसाळा सुरू असल्याने वातावरणातील बदलामुळे संसर्गजन्य रोगांची वाढ होऊ लागली आहे.

जिल्ह्यात स्वाईनचे तीन रुग्ण आढळून आले आहेत. यामध्ये सातारा तालुक्यातील आरफळ, महाबळेश्‍वर आणि वाशी, मुंबई येथील एका रूग्णाचा समावेश आहे. स्वाईनचे रूग्ण सापडल्यानंतर जिल्हा आरोग्य यंत्रणेकडून प्राथमिक आरोग्य केंद्राला सूचना दिल्या आहेत. नागरिकांना काळजी घेण्याचे व वेळेवर तपासणी करण्याचे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे. विषाणूचा संसर्ग वाढू नये, यासाठी आरोग्य केंद्र व रुग्णालयात औषधे व यंत्रणा सज्ज झाली आहे. तसेच आयसोलेशन केंद्र देखील असल्याने अशा रुग्णांना वेळीच उपचार मिळू शकतात, याची खबरदारी घेण्यात आली आहे.

दरम्यान, रुग्ण आयसीयू उपचारास दाखल असल्यास, स्वाईन फ्ल्यूची लक्षणे 8 दिवसांतील असल्यास आणि कोरोना टेस्ट निगेटीव्ह असल्यास संशयिताचे नमुने घेतले जात आहेत. सिव्हिलमधून दर बुधवारी हे नमुने पाठवण्यात येणार आहेत. रुग्णांनी गर्दीमध्ये जाणे टाळावे, शिंकताना, खोकताना रुमाल वापरावा. हात स्वच्छ धुवावे. प्रतिकारशक्ती वाढवणारा आहार घ्यावा. ताप, खोकला अशी लक्षणे आढळल्यास तात्काळ तपासणी करावी, असे आवाहन जिल्हा शल्यचिकीत्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी केले आहे.

Back to top button