

बामणोली; पुढारी वृत्तसेवा : कांदाटी खोर्यातील रघुवीर घाटात महाकाय दरड कोसळली असून या खोर्यातील 16 गावांचा खेड, खोपी, रत्नागिरी या बाजारपेठांशी असणारा संपर्क तुटला आहे. कांदाटी खोर्यातील सोळा गावांमधील ग्रामस्थ हे रघुवीर घाट मार्गे खेड, खोपी या रत्नागिरी जिल्ह्यातील ठिकाणी बाजार, दवाखाना व इतर जीवनावश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी या ठिकाणी जातात.
मात्र रघुवीर घाटामध्ये दरड कोसळल्याने सोळा गावातील लोकांचा खेड, खोपी या ठिकाणी असणारा संपर्क पूर्णपणे तुटला आहे. कांदाटी खोर्यातील सोळा गावे ही सातारा जिल्ह्यात येत असून खेड, खोपी ही ठिकाणे रत्नागिरी जिल्ह्यात मोडतात. रत्नागिरी आणि सातारा जिल्हा यांना जोडणारा मुख्य मार्ग हा रघुवीर घाटातून सिंधी, वलवन मार्गे कांदाटी खोर्यातील वाघावळे, उचाट या भागात येणारा मुख्य रस्ता आहे. याच घाटातून खेड डेपोतून या सोळा गावांमध्ये एसटीची सेवा देखील सुरू असते. तसेच खाजगी वाहनांची देखील याच मार्गावरून ये-जा सुरू असते. मात्र रघुवीर घाटामध्ये कोसळलेल्या महाकाय दरडीमुळे सिंधीपासून पिंपरी, दरे तर्फ तांब या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गावापर्यंतची वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. त्यामुळे कांदाटी खोर्यातील सोळा गावांचा रत्नागिरी जिल्ह्यातील बाजारपेठ खेड खोपी या ठिकाणांशी संपर्क तुटला आहे.
दरम्यान, कांदाटी खोर्यातील 16 गावांचा खेड, खोपी या ठिकाणांशी दरड कोसळल्यामुळे संपर्क तुटल्याने दळणवळण पूर्णपणे ठप्प झाले आहे. त्यामुळे सातारा जिल्हा परिषद तापोळा लाँच युनिट मार्फत सुरू असणारी सर्विस लाँच सेवा सुरू करावी. जेणेकरुन या भागातील आजारी रुग्ण व इतर गोष्टींसाठी नागरिकांना बामणोली, तापोळा, सातारा, महाबळेश्वर येथे ये-जा करणे सोयीचे होईल. त्यामुळे जिल्हा परिषद प्रशासनाने तत्काळ कांदाटी खोर्यातील सर्विस लाँच सेवा सुरू करावी, अशी मागणी कांदाटी खोर्यातील ग्रामस्थांनी केली आहे.