सातारा : महापूर आला धावून सर्वच गेलं वाहून | पुढारी

सातारा : महापूर आला धावून सर्वच गेलं वाहून

पाटण : गणेशचंद्र पिसाळ ढगफुटी, भूस्खलन, महापूर अशा नैसर्गिक आपत्तीत अनेकांनी वर्षानुवष पै पै गोळा करून उभा केलेला संसार व दुभत्या जनावरांसह गाडली किंवा वाहून गेली. तालुक्यातील सार्वजनिक रस्ते, पिण्याच्या पाण्याच्या योजना, हजारो एकर शेती, शाळा, समाज मंदिरे ते अगदी सार्वजनिक स्मशानभूमी ही यात उध्वस्त झाल्या. अब्जावधी रूपयांची हानी झाली आणि काही क्षणातच होत्याचं नव्हतं झालं. डोळे उघडून बघण्याची संधीही निसर्गाने दिली नाही.

‘ये गं ये गं सरी माझे मडके भरी, सर आली धावून मडके गेले वाहून’ अशा बाल कविता त्या काळात मनाला वेगळाच आनंद, उत्साह आणि ऊर्जा देऊन जायचा. पण हाच निसर्ग आणि पाऊस ज्यावेळी सर्वसामान्यांच्या मुळावर उठल्यानं ढगफुटी, अतिवृष्टी, भूस्खलन, महापुरातून माणसांसोबतच रहाती घरं, वर्षानुवर्षे जोडलेला संसार, शेतातील पीकच नव्हे, तर शेत जमिनीही अक्षरशः गाडून टाकतो किंवा वाहून नेतो. त्यावेळी मग याला काय म्हणायचे ? हा कोप नैसर्गिक की मानवी या पेक्षा यात झालेली जिवित व वित्त हानी ही अतिशय दुःख व क्लेशदायी ठरली. ज्या अंगणात छोट्याशा डबक्यात लहानपणी कागदाच्या बोटी करून मनमुराद आनंद घेतला, त्याच अंगणातच महापुरामुळे शासनाच्या बोटी आल्या. गळ्यापर्यंत पाणी आणि त्यातून जीव वाचण्यासाठी अंगावरच्या कपड्यांसह भरलां संसार जागेवरच ठेवून बाहेर पडावं लागलं. ज्या बालकांनी पहिला वाढदिवसही पाहिला नाही, त्यांच्यावरच पुण्यस्मरणाची वेळ आली. हाच उध्वस्त संसार डोळ्यांनी पाहण्यासाठी किमान शेवटचा श्वास घेण्याची संधीही निसर्गानं दिली नाही. ज्या इमारती नव्हे, तर वास्तूंनी ऊन, वारा, पावसात सावली व निवारा देत आपलं रक्षण केलं, त्याच वास्तूंना या प्रकोपात कुटुंबियांसोबतच स्वतःलाही गाडून घ्यावे लागलं. त्या दुःखाची कल्पना शब्दात मांडता येणार नाही.

एका बाजूला मोठ्या प्रमाणावर वैयक्तिक हानी झाली. त्याचवेळी दुसरीकडे सार्वजनिक मालमत्तेचेही मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. प्रामुख्याने हजारो एकर शेती वाहून गेल्याने व जमिनीत भलेमोठे दगड, वाळू, गोटे आल्याने ते बाजूला काढण्याचा खर्चही परवडणारा नसल्याने संबधितांना त्या जमिनी पाडून ठेवण्याशिवाय पर्यायच नाही. गतवर्षी झालेल्या नुकसानीची भरपाई कधी आणि कशी होणार ? याबाबतच्या प्रतिक्षा मात्र अद्यापही सुरूच आहेत.

आभाळास ठिगळं घालण्यासारखा प्रकार …
शासनाची तुटपुंजा निधी अथवा तात्पुरती मलमपट्टी पाहता तालुक्यातील प्रचंड मोठे नुकसान म्हणजे आभाळाला ठिगळं घालण्यासारखे आहे. या पुढच्या काळात आवश्यक त्या उपाययोजना करणे गरजेचे आहे. मागील वर्षभरात प्रशासनाकडून अनेक ठिकाणी याबाबत सकारात्मक पावले उचलली गेली. या पावसाळ्यातही खबरदारी व उपायोजनांसाठी प्रशासन सतर्क असल्याचे पाहायला मिळत आहे.

Back to top button