काळजाचा ठोका चुकविणारी ‘ती‘ रात्र! | पुढारी

काळजाचा ठोका चुकविणारी ‘ती‘ रात्र!

पाटण ः गणेशचंद्र पिसाळ गतवर्षी आजच्याच दिवशी म्हणजेच गुरुवार 21 जुलैची रात्र पाटण तालुक्यातील अनेक गावं व कुटुंबियांसाठी काळरात्र ठरली. भूस्खलन, महापूर आपत्तीत तब्बल अडतीसहून अधिक जणांचा मातीच्या ढिगार्‍याखाली अडकून तर काहींचा महापूरात वाहून मृत्यू झाला. रहाती घरं ,काडी काडी गोळा करून उभा केलेला संसार आणि आपल्या पोरा बाळांसह अनेक कुटुंबांना निसर्गाने जलसमाधी दिली. हजारो एकर शेती, पिकं जमिनींसह वाहून गेली. अब्जाधींचे वैयक्तिक, सार्वजनिक नुकसान झाले. कधीही न भरून येणार्‍या अभूतपूर्व हानीच्या वर्षपूर्तीनंतरही या काळ्या आठवणींच्या जखमा आजही भळभळत आहेत.

‘उषःकाल होता होता काळरात्र झाली, अरे पुन्हा आयुष्याच्या पेटवा मशाली, याप्रमाणे या आपत्तीग्रस्तांच्या जीवनात बदल होण्यासाठी स्थानिकांसह प्रशासन, शासन अथवा लोकप्रतिनिधींनी नक्की काय धडा घेतला याचे उत्तर मात्र दुर्दैवानेअद्यापही अनुत्तरितच आहे. आजवर अनेक वर्षे भूकंप ,अतिवृष्टी, महापूर पाचवीलाच पूजलेल्या पाटण तालुक्यात गतवर्षी झालेल्या अतिवृष्टी व भूस्खलनामध्ये काही गावातील कुटुंबेच्या कुटुंबे ,घरादारासह अक्षरशः मातीत गाडली गेली. शेवटचा मोकळा श्वासही त्यांच्या नशिबात नव्हता यासारखे दुःख नाही. निसर्गाचा हा प्रकोप स्थानिकांच्या मुळावर नक्की का उठला याचे उत्तर कोणालाच मिळाले नाही. ज्या भूमिपुत्रांनी आपल्या सर्वस्वाचा त्याग करून याच तालुक्यात अनेक धरणे जन्माला घातली. राज्यातील जनतेची तहान भागवून त्यांच्या जीवनात प्रकाश पाडला. दुर्दैवाने त्याच भूमिपुत्रांच्या बहुसंख्य गावातील हा सार्वत्रिक अंधार जीवघेणा ठरला.

ढगफुटी ,अतिवृष्टी ,भूस्खलनामध्ये अभूतपूर्व अशी जीवित व वित्तहानी झाली . यापूर्वीही 11 डिसेंबर 1967 चा विनाशकारी भूकंप या तालुक्याने पचवला होता. त्याकाळातही धरतीने शेकडो भूमिपुत्रांना आपल्या मिठीत घेतले. दुर्दैवाने तो भूकंप आणि गतवेळचा प्रलयामध्ये अनेकांचे संसार, कुटुंबे उद्ध्वस्त झाली. मोठ्या प्रमाणावर वैयक्तिक, जीवित व वित्तहानी झाली. निसर्गाच्या या प्रकोपामुळे तालुक्यातील अनेक गावात ढगफुटीमुळे नद्या, ओढे, नाल्यांचे नैसर्गिक प्रवाहच बदलून गेले. महाकाय पाणी आजूबाजूच्या शेतीत घुसल्याने शेकडो एकर शेती पिके जमिनींसह वाहून गेली. अनेक ठिकाणी दरडी कोसळल्या, कोयना,मोरणा, पाटण ,चाफळ, तारळे ,ढेबेवाडी आदी भागात अनेक रस्ते खचले, वाहून गेले. शासन, प्रशासन, स्थानिक नेते मंडळींनी सार्वत्रिक खबरदारी व उपाययोजनांसाठी आवश्यक ते प्रयत्न केले. वैयक्तिक व सार्वजनिक पंचनामे झाले मात्र प्रत्यक्षात मदत किती मिळाली हा संशोधनाचा भाग आहे.

सत्ताधारी व विरोधकांनी एकत्रित येऊन तालुक्यासाठी खास बाब म्हणून राज्य व केंद्र शासनाकडून भरीव निधी आणण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे होते पण दुर्दैवाने तसे घडले नाही. कोयना धरण सुरक्षेचा बागुलबुवा करत काही वर्षांपासून धरणातील बोटिंग बंद आहे. आपत्ती काळात कोयनानरच्या नेहरू उद्यानाच्या पुढे अनेक ठिकाणी रस्ते पूर्णतः खचल्याने उद्यानाच्या मागील बाजूच्या बोटिंग धक्यावरून बोटींच्या आधाराने मिरगाव, नवजा, कामरगाव भागातील आपत्तीग्रस्तांना मदत पोहोचवण्याचे काम सुरू होते. स्थानिकांना बोटिंगशिवाय पर्यायच नाही हे त्यावेळी लक्षात येऊनही वर्षभरात मात्र याबाबत कोणतीही कार्यवाही झालेली नाही हे येथील जनतेचे दुर्दैव आहे.

मदत घ्यायला व द्यायला कोण उरलाय..?

आपत्तीत काही पूर्णच्या पूर्ण कुटुंबेच मातीत गाडली गेली. त्यांचा कोणी वारसही शिल्लक राहिलेला नाही. संबंधितांसाठी तुटपुंजी का होईना पण मदतीचा प्रयत्न झाला असला तरी दुर्दैवाने ती मदत घ्यायला कोणी वालीच शिल्लक राहिला नसल्याचेही काही ठिकाणी अनुभवायला मिळाले. याशिवाय केवळ स्वतःच्या निवडणुकीत मतदानासाठी डोंगर पठारावरील गावात जाणारे सत्ताधारी असो अथवा विरोधक नेतेमंडळी आपत्तीच्या निमित्ताने गुडघाभर चिखलातून चालत मैलोनमैल गावापर्यंत पोहचली होती. अतिवृष्टीपेक्षाही घोषणा, आश्वासने फोटोसेशन, प्रसिद्धींचा मोठा पाऊस पाडला . परंतु एका वर्षानंतरही संबंधित कुटुंबे, गावांची दयनीय अवस्था अनेक ठिकाणी ‘जैसे थे’ पहायला मिळत आहे.

प्रशासनालाही आपत्तीचा फटका बसला होता

अतिवृष्टी ,भुस्खलनाचा स्थानिकांना मोठ्या प्रमाणावर फटका बसला. तिच अवस्था प्रशासनाचीही झाली होती. संबंधितांना आपत्तीग्रस्त गावांतपर्यंत पोहोचण्यासाठी अनेक अडचणी पार कराव्या लागल्या. गुडघाभर चिखल, कमरेवर पाण्यातून तब्बल आठ ते दहा किलोमीटरचा पायी प्रवास करावा लागला तर काही ठिकाणी बोटिंचा आधार घ्यावा लागला. मोबाईलला रेंज, नेट नसल्याने तांत्रिक बाबींचाही फटका बसला. मदत कार्यासाठी गेलेले काही अधिकारी स्थानिक पातळीवरच अडकून पडण्याचे प्रसंगही ओढावले होते तरीदेखील रात्रंदिवस प्रशासनाने सेवा व कर्तव्य चोखपणे बजावले होते.

Back to top button