बकासुर गँग तडीपार | पुढारी

बकासुर गँग तडीपार

सातारा : पुढारी वृत्तसेवा सातार्‍यातील शाहूपुरी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील बकासुर गँगमधील सातजणांना पोलिस अधीक्षक (एसपी) अजयकुमार बन्सल यांनी दणका देत 1 वर्षासाठी तडीपार करण्यात आले. सर्व संशयित शहरातील असून, पंचवीशीच्या आतील युवक आहेत. यश नरेश जांभळे (वय 21, रा. झेडपी कॉलनी, शाहूपुरी), आदित्य जयेंद्र गोसावी (वय 21, शुक्रवार पेठ), विशाल राजेंद्र सावंत (वय 20, रा. बुधवार पेठ), साहील जमीर जमादार (वय 21, रा. बुधवार पेठ), ऋतिक ऊर्फ विजय विनोद कांबळे (वय 23, रा. बुधवार नाका), प्रज्वल प्रवीण गायकवाड (वय 24, अंजली कॉलनी, शाहूपुरी), शिवम संतोष पुरीगोसावी (वय 18, रा. गडकरआळी सर्व सातारा) अशी तडीपार केलेल्यांची नावे आहेत. यातील यश जांभळे हा टोळीप्रमुख असून, संशयितांचा बकासूर नावाचा ग्रुप आहे.

याबाबत अधिक माहिती अशी, संशयित आरोपींवर शाहूपुरी, सातारा शहर व सातारा तालुका पोलिस ठाण्याच्या हद्दीत खूनाचा प्रयत्न करणे, बेकायदा शस्त्र बाळगणे, दरोडा टाकणे, जबरी चोरी, गंभीर दुखापत, मारहाण करणे, अवैध शस्त्राांचा धाक दाखवून धमकावणे, मटका जुगार चालवणे असे विविध प्रकारचे गंभीर गुन्हे त्यांच्यावर दाखल आहेत. यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये त्यांच्याविषयी भिती आहे. गुन्हे दाखल झाल्यानंतर पोलिस संशयितांवर प्रतिबंधात्मक कारवाई करुन त्यांना सुधारण्याची संधी देत होते. मात्र संशयित वारंवार गुन्हे करत होते. यामुळे सातारा शहर पोलिस ठाण्याचे पोनि भगवान निंबाळकर यांनी संशयित टोळीचा प्रस्ताव तयार करुन पोलिस अधीक्षक अजयकुमार बन्सल यांच्याकडे पाठवला.

हद्द प्राधीकरणासमोर वेळोवेळी सुनावणी झाल्यानंतर बन्सल यांनी टोळीला पूर्ण सातारा जिल्ह्यातून तडीपार केले. दरम्यान, याच टोळीतील काही जणांवर चार दिवसांपूर्वी दरोड्याचा गुन्हा दाखल झाला आहे. कॉलेज समोर अल्पवयीन मुलाला मारहाण करत त्याच्याकडील पैसे, घड्याळ चोरुन दरोडा टाकला आहे. संशयित दरोड्याच्या गुन्ह्यात सध्या असून यात जामीन मिळाल्यानंतर त्यांना 1 वर्षासाठी तडीपार केले जाणार आहे.

Back to top button