सातारा : आले दरात वाढीने शेतकर्‍यांना दिलासा | पुढारी

सातारा : आले दरात वाढीने शेतकर्‍यांना दिलासा

सातारा; पुढारी वृत्तसेवा : कोरोनाच्या संसर्गानंतर आले पिकात झालेल्या घसरणीने आले उत्पादक शेतकरी मेटाकुटीला आले होते. पुरवठ्याच्या तुलनेत मागणी वाढल्याने दरात थेट दुपटीने वाढ झाली आहे. आल्याच्या प्रत्येक गाडीमागे साधारण साडे सात हजार रूपयांची दरवाढ होवून प्रती गाडीचा दर हा 14 ते 16 हजारांच्या घरात गेला आहे. त्यामुळे शेतकर्‍यांमध्ये समाधान आहे.

आले उत्पादक शेतकरी चार ते पाच वर्षांपासून संकटाच्या गर्तेत सापडले होते. कोरोनाचा संसर्ग राहिल्याने दरात कायम घसरण, वाढलेल्या किडी, रोग व त्यामुळे वाढलेला भांडवली खर्च, यामुळे आले उत्पादक शेतकरी तोट्यात आहे. त्यामुळे आल्याच्या क्षेत्रातही घट झाली आहे. गेले दोन वर्षांपासून प्रति गाडीस अवघा चार ते सहा हजार रुपयांवर दर होता. हा दर परवडणारा नसल्याने अनेक शेतकर्‍यांनी आले न काढता जमिनीतच ठेवले होते.

सध्या आले पिकाचे कमी झालेले क्षेत्र आणि व्यापार्‍यांकडून वाढलेली मागणी यामुळे दरामध्ये दुपटीने अधिक वाढ झाली आहे. 6 हजारांच्या घरात असणारा तर हा 14 ते 16 हजारांच्या घरात पोहचला आहे. यामुळे शेतकर्‍यांना दिलासा मिळाला आहे.

30 टक्के क्षेत्रात घट

तीन वर्षांत आले उत्पादक कमालीचा अडचणीत आल्याने नवीन आले लागवडीचा कल कमी झाला आहे. मिळणारा दर व उत्पादन याचा मेळ बसत नसल्याने किमान 30 ते 40 टक्के घट झाली आहे. या घटीमुळे आल्याचे उत्पादन कमी होणार आहे. मागील तीन वर्षांत आले पिकाचे दर वाढलेले नाहीत. मात्र, मागील महिन्यापासून आल्याची मागणी वाढू लागल्याने दरात वाढ होऊ लागली आहे.

 

Back to top button