सातारा : आशा आणि गटप्रवर्तकांचे मानधन रखडले

सातारा : आशा आणि गटप्रवर्तकांचे मानधन रखडले

सातारा : पुढारी वृत्तसेवा ग्रामीण भागातील आरोग्य सेवेमध्ये महत्त्वाची भूमिका बजावणार्‍या आशा वर्कर आणि गटप्रवर्तकांचे मानधन गेल्या 3 महिन्यांपासून रखडले आहे. त्यामुळे जीवावर उदार होवून काम करणार्‍या आशा वर्कर आणि गटप्रवर्तक आता चांगल्याच आर्थिक अडचणीत आल्या आहेत. त्यामुळे त्यांच्या कुटुंबाच्या उदरनिर्वाहाचा प्रश्‍न ऐरणीवर आला आहे. सातारा जिल्ह्याच्या ग्रामीण भागात 2 हजार 672 आशा स्वयंसेविका व शहरी भागात 99 तर 134 गटप्रवर्तक काम करत आहेत.

या स्वयंसेविकांना कामावर आधारित मोबदला देण्यात येतो. दैनंदिन कामासोबतच या सेविकांनी कोरोनाच्या काळात मोठे योगदान दिले आहे. कोरोना काळात आशा वर्कर व गटप्रवर्तक यांनी स्वत:चा जीव धोक्यात घालून घरोघरी जावून सर्वेक्षण केले. तसेच रुग्णांना विलगीकरण कक्षात दाखल केले. त्यांच्या नोंदी जमा करण्याची जबाबदारी त्यांच्यावर सोपवली होती. मात्र, वरिष्ठ पातळीवरून बँक खाते बदलण्याच्या नावाखाली गेल्या 3 महिन्यांपासून आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तकांना मानधनापासून वंचित राहावे लागत आहे. मानधन देण्यासाठी निधीच उपलब्ध नसल्याची कारणे देण्यात येत होती. त्यानंतर नव्याने बँक खाते उघडण्याचे काम सुरू असल्याचे आशा स्वयंसेविकांना सांगण्यात येत आहे.

गेल्या 3 महिन्यांपासून मानधन रखडले असल्याने त्यांच्या कुटुंबांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्‍न ऐरणीवर आला आहे. मुलांचे शालेय शिक्षण, कुटुंबातील वृद्ध नागरिकांचे आजारपण, बँक, सोसायटीच्या कर्जाचे हप्ते कसे भागवायचे? असा प्रश्‍नही या आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तकांना पडला आहे. तर काहींनी अनेकांकडून हात उसने पैसे घेवून कुटुंबाचा चरितार्थ चालवत आहेत. मात्र त्यांच्याकडूनही उसने घेतलेल्या पैशाची मागणी होत आहे. त्यामुळे आशा स्वयंसेविका आणि गटप्रवर्तकांसमोर मोठे आर्थिक संकट निर्माण झाले आहे. याबाबत संपर्क साधला असता तेथील अधिकार्‍यांनी शासनाकडून अनुदान आले नसल्याने एप्रिल, मे व जून महिन्याचे अनुदान रखडले असल्याचे सांगण्यात आले.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news