

उंडाळे; पुढारी वृत्तसेवा :कराड दक्षिणच्या डोंगरी भागात बुधवारी दुपारी दोन ते अडीच तास मध्यम स्वरूपाच्या पावसाने हजेरी लावल्याने धूळवाफ पेरणी केलेल्या पिकांना जीवदान मिळाले आहे. पाऊस लांबल्याने इतर विभागातील पेरणी गतवर्षीच्या तुलनेत तब्बल एक महिना लांबल्याने शेतकरी चिंतातुर बनला आहे.
कराड दक्षिणच्या डोंगरी भागात बुधवारी दुपारी बारा वाजता नांदगाव, ओंड, उंडाळे, टाळगाव, घोगाव, येळगाव, भूरभुशी, भरेवाडी, गोटेवाडी, म्हासोली, येणपे, जिंती, येवती, घराळवाडी, सवादे, तुळसण, पाटीलवाडी, आकाईवाडी, माटेकरवाडी, चोरमारेवाडी या सहा परिसरात पावसाने मध्यम पण चांगली हजेरी लावली. सलग दोन ते अडीच तास हा स्वरूपाचा पाऊस सुरू होता. या जिरविण्याच्या पावसाने धूळवाफ भात पेरणी केलेल्या क्षेत्रातील पिकांना जीवदान मिळाले आहे. या पावसाने उंच सखल भागात पाणी साचले याशिवाय नवी लागण केलेल्या उसाच्या सार्या तही पाण्याने भरलेलं चित्रं अनेक ठिकाणी दिसून आले.
मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात डोंगरी भागातील शेतकर्यांनी मान्सूनचा अंदाज घेत काळ्या मातीत धूळवाफ भात पेरणी केली. परंतु, या वर्षी नेहमी वेळेपूर्वी येणारा काळी वादळी किंवा मान्सून पाऊस आलाच नाही. याशिवाय उन्हाळ्यातील या पावसाने हजेरी न लावल्याने खरिपाची मशागत करताना शेतकर्यांना अनंत अडचणींना तोंड द्यावे लागले. यावेळी जून महिना संपून पेरणीचा कालावधी टळून जाण्याची वेळ गेली तरी पाऊस आला नाही. संपूर्ण जून महिना पावसाने कोरडा घालवला त्यामुळे उंडाळे ओंड नांदगाव काले यासह कृष्णा काठावरील विभागातील भुईमूग, सोयाबीन, ज्वारी, भात यासह पेरण्या रखडल्या आहेत.
अद्यापही पावसाचा जोर नसल्याने पेरणी करून करायचे काय? या चिंतेत शेतकरी आहेत. गतवर्षी या महिन्यात खरिपाच्या शंभर टक्के पेरण्या होऊन शेतकरी अंतर मशागतीच्या कामाला लागला होता. परंतु यावर्षी अद्यापही पावसाने हजेरी लावली नाही ढगाळ वातावरण व कुठेतरी पडणारे पावसाचे चार थेंब एवढ्यावरच हा पाऊस थांबत आहे. त्यामुळे पेरणी करण्यासाठी शेतकरी कचरत आहे. बुधवारीही नांदगाव, धोंडेवाडी पर्यंत पावसाच्या सरी आल्या; पण तेथून पुढे केवळ पावसाचा शिडकावा झाला. अजूनही वादळी पावसाळी वातावरण दिसते. परंतु कसाही असला तरी हा वादळी पाऊस मात्र धूळवाफ भात पेरणी केलेल्या शेतकर्यांना जीवदान देणारा ठरला.
धूळवाफ पेरणी केल्यापासून डोंगरी विभागात पाऊस नसल्याने या भागातील धूळवाफ भात पेरणी केलेले व उगवण झालेले क्षेत्र सुकून वाळू लागले होते. पण, कालच्या बुधवारच्या पावसाने या पिकांना जीवदान मिळाले आहे.