सातारा : विठुरायाची ओढ; पण पावसाअभावी हिरमोड

सातारा : विठुरायाची ओढ; पण पावसाअभावी हिरमोड

सातारा; पुढारी वृत्तसेवा : कोरोनाच्या महामारीमुळे गेली दोन वर्षे श्री संत तुकाराम महाराज व श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा झाला नाही. सुमारे दोन वर्षांनंतर वारी सोहळा होत असल्याने शेतकरी वारकर्‍याला विठुरायाच्या दर्शनाची ओढ लागली असली दुसरीकडे मात्र पावसाने ओढ दिल्याने खरिपाच्या पेरण्या लांबणीवर पडल्या असल्याची सल वारकर्‍यांच्या मनामध्ये आहे. त्यामुळे यंदाच्या पालखी सोहळ्यावर चिंतेचे ढग दिसू लागले आहेत. त्यामुळे पालखी सोहळ्यात सध्या तरी वारकर्‍यांची गर्दी तुलनेने कमी दिसली तरी आषाढी एकादशीला पंढरपूरात विक्रमी गर्दी होण्याची शक्यता आहे.

कोरोनामुळे गेली दोन वर्षे पायी पालखी सोहळा झाला नाही. लॉकडाऊनचा फटका सर्वच समाजघटकांना बसला. त्यामुळे गेली दोन वर्षे वारकर्‍यांची पंढरपूर वारी झाली नाही. भारतभूमी ही जशी कृषिप्रधान आहे तशीच तिची संस्कृतीही तत्वज्ञानयुक्त अशा भक्ती सान्निध्याने ओथंबलेली आहे. वारकरी परंपरेची विठ्ठलभक्ती व वारी अनादी कालापासून आली आहे. 'कांदा मुळा भाजी, अअवघी विठाबाई माझी', अशा विठ्ठलभक्तीचे वर्णन विविध संतांनी आपल्या अभंग रचनेत केले आहेत. या अभंग रचनेप्रमाणेच वारकरी शेतकरीही आपल्या काळ्या मातीत सोनं पिकण्यासाठी कष्ट करत असतो. त्याला निसर्गाची साथ आवश्यक असते. परंतु गेल्या काही दिवसांपासून पावसाने दडी मारली आहे. जून महिना संपत आला असला तरी पावसाने ओढ दिली आहे. याची चिंता सर्व वारकर्‍यांना लागून राहिलेली आहे.

दरवर्षी पालखी सोहळ्यापूर्वी खरीप हंगामातील पेरण्या उरकून वारकरी मोठ्या संख्येने संत ज्ञानेश्वर महाराज व संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यात सहभागी होत असतात. मात्र यावर्षी सर्व चित्र उलटेच पहावयास मिळत आहे.पालखी सोहळा सुरू झाला असला तरी निसर्गाने पाऊस लांबणीवर टाकलेला आहे. बहुतांश शेतकरी व वारकरी पेरण्या पूर्ण झाल्यानंतर लोणंद या ठिकाणाहून जसजसा पालखी सोहळा पुढे जाईल तसतशी पालखी सोहळ्यात भाविकांची संख्या मोठी होत जाते. शेतकर्‍यांना विठुरायाची ओढ लागली असली तरी पावसाने मात्र पाठ फिरवली आहे. त्यामुळे शेतकर्‍यांच्या मनामध्ये हुरहुर लागून राहिली आहे. वारकरी शेतकर्‍यांचे डोळे आभाळाकडे लागून राहिले आहेत. काही शेतकर्‍यांनी तर लवकरात लवकर पाऊस पडावा व वारीला भरपूर प्रमाणात शेतकरी व वारकरी यावेत, असे साकडे घातले आहे.

पेरण्या खोळंबल्याने शेतकरी चिंतेत….

गेल्या अनेक दिवसांपासून पावसाने पाठ फिरवल्याने पेरण्या रखडल्या आहेत. वेळेत पाऊस न पडल्यास खरीप हंगाम वाया जाण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. मुबलक पाऊस न पडल्याने पेरण्या खोळंबल्या आहेत. दुष्काळाचे सावट या वारी सोहळ्यावर आल्याचे चित्र ठिकठिकाणी पहावयास मिळत आहे.त्यामुळे या वारी सोहळ्यात वारकरी व शेतकर्‍यांची गर्दी कमी जाणवणार असली तरी आषाढी एकादशी दिवशी मात्र पंढरपुरात मोठी गर्दी होईल, असा अंदाज व्यक्त होत आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news