‘अजिंक्यतारा’ची निवडणूक बिनविरोध

‘अजिंक्यतारा’ची निवडणूक बिनविरोध
‘अजिंक्यतारा’ची निवडणूक बिनविरोध

सातारा : पुढारी वृत्तसेवा शेंद्रे येथील अजिंक्यतारा सहकारी साखर कारखान्याची निवडणूक बिनविरोध झाली आहे. आ. शिवेंद्रराजे यांच्यासह त्यांच्या पॅनेलचे सर्व 21 संचालक हे अर्ज छानणी दिवशीच बिनविरोध निवडून आले आहे. अर्ज छानणीमध्ये शेतकरी संघटनेच्या 5 उमेदवारांचे अर्ज विविध कारणास्तव बाद ठरवण्यात आले. दरम्यान, 22 हजार सभासदांनी विश्‍वास दाखवल्याने आ. शिवेंद्रराजे यांनी आभार मानले. किसनवीर कारखान्यानंतर काही दिवसांपूर्वी अजिंक्यतारा सहकारी कारखान्याचा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला होता. मंगळवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस होता. अखेरच्या दिवसापर्यंत 21 जागांसाठी 26 अर्ज आले होते.

अर्ज दाखल झाल्यानंतर बुधवारी सर्व अर्जांची छानणी झाली. यामध्ये आ. शिवेंद्रराजे यांच्यासह त्यांच्या पॅनेलच्या सर्व उमेदवारांचे अर्ज वैध ठरले, तर विरोधी शेतकरी संघटनेच्या पाच उमेदवारांचे अर्ज अवैध ठरले. त्यामुळे कारखान्याची निवडणूक बिनविरोध झाली आहे.
कारखान्यासाठी नागठाणे ऊस उत्पादक गटातून अरुण निकम, चिंचणेर गटातून दत्तात्रय शिंदे, राजेंद्र बर्गे आणि भिकू शेळके, तर गोवे गटातून अर्जुन साळुंखे यांचे अर्ज बाद झाले. सलग तीन वर्षे कारखान्याला ऊस न घालणे व कारखान्याची शेअरची रक्‍कम न भरणे या दोन कारणांमुळे हे अर्ज बाद ठरवण्यात आले. त्यामुळे आ. शिवेंद्रराजे यांच्यासह त्यांचे पूर्ण पॅनेल कारखान्यावर बिनविरोध निवडून गेले आहे.

यामध्ये सातारा ऊस उत्पादक गटातून आ. शिवेंद्रराजे भोसले, नामदेव सावंत, राजेंद्र घोरपडे, नागठाणे गटातून मोहनराव साळुंखे, एकनाथ निकम, यशवंत साळुंखे, अतीत गटातून शिवाजी काळभोर, रामचंद्र जगदाळे, बजरंग जाधव, चिंचणेर गटातून विश्‍वास शेडगे, भास्कर घोरपडे, विजयकुमार घोरपडे आणि गोवे गटातून सर्जेराव सावंत, पांडूरंग साबळे, नितीन पाटील हे बिनविरोध निवडून आले. याचबरोबर उत्पादक सहकारी संस्थातून शशिकांत साळुंखे, महिला राखीवमधून विजया फडतरे, वनिता शेलार, अनुसूचित जाती. जमातीमधून वसंत पवार, विमुक्‍त भटक्या जाती-जमातीमधून अशोक कुराडे, ओबीसीमधून जयवंत कुंभार हे बिनविरोध निवडून गेले आहेत.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news