सातारा : पालखी मार्गावरील विहिरींचे शुद्धीकरण | पुढारी

सातारा : पालखी मार्गावरील विहिरींचे शुद्धीकरण

सातारा; पुढारी वृत्तसेवा : पालखी सोहळ्यात सहभागी असलेल्या वारकरी व नागरिकांना शुध्द पाणी पुरवठा करण्यासाठी पालखी मार्गावरील पाण्याचे उदभव असणार्‍या विहिरी, तलाव, नदी, कुपनलिकांची पाहणी करुन दि. 24 जूनपासूनच पाण्याचे नियमीत शुध्दीकरण केले जाणार आहे. पाण्याच्या दर चार तासाला ओटी टेस्ट करण्यात येणार आहेत.

श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा सातारा जिल्ह्यातून दि.28 जून ते 4 जुलै असा मार्गक्रमण करणार असल्याने पालखी सोहळा मार्गावरील पाणी पुरवठा योजनांची पहाणी करण्यात आली असून संबंधित विभागावर जबाबदार्‍या निश्चित करण्यात आल्या आहेत. सार्वजनिक विहिरी 8, खाजगी विहिरी 328, बोअरवेल 55, नळ योजना 9 यावरुन पाणीपुरवठा होणार आहे.पालखी मार्गावरील दुतर्फा असणार्‍या सार्वजनिक व खाजगी विहिरींचे पालखी आगमनापूर्वी तीन दिवस ब्लिचींग पावडरची योग्य ती मात्रा देवून पाण्याचे निर्जंतुकीकरण संंबधित ग्रामपंचायत तसेच प्राथमिक आरोग्य केंद्रातील आरोग्य कर्मचार्‍यामार्फत करण्यात येणार आहे. तर खंडाळा तालुक्यात पंपीग स्टेशन पाडेगाव, मर्दाणी विहीर, कॅनाल शेजारील विद्युत पंप, निंबोडी बाळासाहेब शेळके विहीर, अंकुश शेळके विहीर, गोठेमाळ पाण्याची टाकी, जिजाबा शेळके विद्युत पंप, भिकुबा शेळके विद्युत पंप, लक्ष्मण शेळके, शेखर क्षीरसागर तसेच फलटण तालुक्यात तरडगाव परिसरात ठोंबरे वस्ती पाणीपुरवठा नवीन टाकी कुसूर, चौपाळा नवीन टाकी मिरेवाडी कुसूर, शिंदेमळा पाणीपुरवठा पाईपलाईन प्रा. शा. जवळ, सार्व. विहीर कुसूर, संतोष नरुटे विहीर कुसूर, गिरवी परिसरात सोमवार पेठ नगरपालिका पाणी पुरवठा केंद्र फलटण, जाधववाडी खाजगी पाणी बोअर, राजाळे परिसरात सार्वजनिक पाणी पुरवठा टाकी विडणी, बरड परिसरात दत्तू घोलप विहीर, महादेव राऊत विहीर, बाळासाहेब शेंडे विहीर आदी ठिकाणी टँकर भरण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. पाणी शुध्दीकरणासाठी वापरलेली टीसीएल मात्रा शुध्दीकरणाची वेळ, पाण्याच्या साठ्याची नोंद याबरोबरच पाणी शुध्दीकरण झाल्याची तपासणी केल्याची नोंद स्वतंत्र रजिस्टरमध्ये करण्यात येणार आहे. प्राथमिक आरोग्य केंद्राच्या कार्यक्षेत्रात पालखी मार्गावरील विहिरींचे पाणी शुध्दीकरणाचे वेळापत्रक तयार करुन कर्मचार्‍यांची नियुक्ती करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. राधाकिशन पवार यांनी दिली.

आरोग्य विभागाकडे राहणार टँकरची नोंद…

पिण्याच्या पाण्याची सूचना देणारे फलक ठिकठिकाणी लावण्यात येणार आहेत. पालखी सोहळ्यात पुणे जिल्ह्यातील 19 , सातारा 20 यासह अन्य दिड्यांचे टँकर व खासगी टँकरही मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत. प्रत्येक टँकरची नोंद आरोग्य विभागाकडे राहणार आहे.

Back to top button