महाबळेश्वर : प्रस्थापितांना ‘पुन्हा येईन’ म्हणण्याची संधी

महाबळेश्वर : प्रस्थापितांना ‘पुन्हा येईन’ म्हणण्याची संधी

महाबळेश्वर; प्रेषित गांधी : महाबळेश्वर गिरिस्थान नगरपरिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीचे वातावरण आता तयार झाले आहे. आरक्षण प्रकिया पार पडल्यानंतर राजकीय वातावरण ढवळून गेले असून या आरक्षणाने प्रस्थापितांना 'पुन्हा येईन' म्हणण्याची संधी मिळाली तर काहींचा भ्रमनिरास झाला आहे. असे असले तरी निवडणुकीत आता खरी रंगत निर्माण होणार आहे.

महाबळेश्वर नगरपालिकेत यंदा एकूण दहा प्रभाग असून एकूण 20 सदस्य निवडून जाणार आहेत. महाबळेश्वरचा राजकीय इतिहास पाहता येथे राजकीय पक्षांपेक्षा स्थानिक आघाड्यांनाच अधिक महत्व राहिले आहे. कोण कुठल्या पक्षात आहे यापेक्षा किती 'खर्च' करेल,आपल्याला कसा 'सोयीचा' ठरेल हे पहिले जाते.आतापर्यंतच्या निवडणुकांमध्ये हाच कित्ता गिरवला गेला असून महाबळेश्वरच्या राजकारणात पक्षापेक्षा पैशाला अधिक महत्व आहे, हे प्रत्येक निवडणुकीमध्ये अधोरेखित झाले आहे. गेली अनेक वर्षे येथील राजकारणात 'शेठ', 'साहेब' यांना अधिक महत्व राहिले आहे. महाबळेश्वरचे राजकारण हे डी. एम. बावळेकर, किसनशेठ शिंदे व पी. डी. पार्टे या डीएसपीशिवाय अपूर्णच होते. कधी एकत्र येत तर काही विरोधात मात्र सत्ता आपलीच हे समीकरण महाबळेश्वरवासीय अनुभवत होते. गत निवडणुकीत मात्र नगराध्यक्षपदाचे आरक्षण अनुसूचित जातीतील महिलेसाठी जाहीर झाल्याने इच्छुक प्रस्थापितांचा मोठा भ्रमनिरास झाला होता. पाच वर्षांपूर्वी झालेल्या पालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत कोणताही गाजावाजा न करता राष्ट्रवादीने विरोधकांना 'जोर का झटका' देत थेट नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत स्वप्नाली शिंदे यांनी विजय मिळवल्याने महाबळेश्वरचे राजकारण 'कुमार वयात' आले. निम्म्याहून अधिक जागा जिंकत व काही अपक्षांना गाळाला लावत त्यांनी आपली मोहीम फत्ते केली होती. यावेळच्या निवडणुकीसाठी सोमवारी आरक्षण सोडत पार पडली. त्यामध्ये खुल्या वर्गासाठी अधिक जागा असल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे निवडणुकीला खरी रंगत येणार आहे. दहा महिलांना निवडून जाण्याची संधी मिळणार आहे. त्यामुळे महिला वर्गाचा दबदबा राहणार आहे. महाबळेश्वरातील स्थानिक नेत्यांनी आतापासूनच प्रभागवार नावे निश्चित करण्याची तयारी सुरु केली असून आपल्या सोईचे ठरणार्‍यांसोबत संपर्क सुरु केला आहे. आता इच्छुकांचीच संख्या अधिक असल्याने कुणी कसं कुणासोबत अ‍ॅडजेस्ट होतो हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. महाबळेशवर शहरातील सर्वच प्रभागांमध्ये अटीतटीची लढणं होणार असल्याची शक्यता असून अनेक नवखे उमेदवार आपले नशीब अजमावण्यासाठी सज्ज झाले आहेत.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news