

सातारा : जिल्हा परिषदेच्या शाळांमधून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी ज्ञानदानाचं काम होत असते; मात्र या ज्ञानदान करणार्या 94 शाळांमधील 220 वर्ग खोल्या धोकादायक बनल्या आहेत. काही ठिकाणी भिंतींना तडे, वर्ग खोल्या जीर्ण, छप्पर खचले आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. या शाळांमधील विद्यार्थी जीव मुठीत घेऊन शिक्षण घेत आहेत. त्यासाठी प्रशासनाने लक्ष देऊन धोकादायक वर्ग खोल्यांची दुरुस्ती करावी, अशी मागणी ग्रामस्थ व पालकांमधून होत आहे.
सातारा जिल्ह्याच्या महाबळेश्वर, सातारा, वाई, कराड, पाटण, माण, जावली या तालुक्याच्या दुर्गंम भागात मोठ्या प्रमाणात जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळा आहेत. या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाऊस पडतो. या ठिकाणी उभारण्यात आलेल्या शाळांच्या इमारती धोकादायक आहेत. छतांना गेलेले तडे, वारा अन् पावसामुळे छतांचे तुकडे वर्गामध्ये पडणे, पत्र्यांचा जोरदार आवाज येणे, पावसाळ्यात वर्ग खोल्या गळणे असे प्रकार या प्राथमिक शाळांमध्ये घडत आहेत. त्यामुळे त्या वर्गावर शिकवणार्या शिक्षकांसह विद्यार्थ्यांचा जीव टांगणीला लागला आहे.
सर्व शिक्षा अभियानाच्या माध्यमातून तर काही ठिकाणी जिल्हा वार्षिक योजना निधीच्या माध्यमातून शाळांची बांधकामे करण्यात येतात. यासाठी दरवर्षी लाखो रुपयांचा निधी खर्च केला जातो. मात्र झालेली ही बांधकामे गुणवत्तापूर्ण होतात का? या बांधकामांची त्रयस्थ यंत्रणेमार्फत तपासणी करणे गरजेचे आहे. तसेच बांधकामांची पाहणी करण्यासाठी विशेष पथकांची नियुक्ती आवश्यक आहे. त्याबरोबरच दरवर्षी शाळांचे बांधकाम ऑडीट होणे आवश्यक आहे.
जिल्ह्यातील बहुतांश प्राथमिक शाळांची कमी अधिक प्रमाणात दुरावस्था झाली आहे. मात्र शाळांच्या दुरुस्तीकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. बहुतांश शाळांची दुरुस्ती प्रशासनामार्फत करण्यात आली नसल्याने याच धोकादायक इमारतीमध्ये विद्यार्थ्यांना शिक्षण घ्यावे लागत आहे. शिक्षण विभागाकडून दरवर्षी लाखो रुपयांचा खर्च हा विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी की ठेकेदारांच्या फायद्यासाठी केला जातो, असा सवाल पालकांमधून उपस्थित होत आहे.
जिल्ह्यातील धोकादायक शाळांची स्थिती...
महाबळेश्वर तालुक्यातील दांडेघर, खरोशी, दुधगाव प्रत्येकी 1 खोली, सातारा तालुक्यातील मांडवे 5, कोडोली 3, वाई तालुक्यातील खडकी 2, खंडाळा तालुक्यातील पारगाव 4, वाठार बु.3, बोरी 7, शिवाजीनगर 5, बाळूपाटलाचीवाडी 2, फलटण तालुक्यातील बागेवाडी 3, सांगवी 5, माळेवाडी सांगवी 2, वडजल 2. कराड तालुक्यातील मालखेड, जुळेवाडी, हनुमानवाडी, पाटीलवाडी शेवाळवाडी, हणमंतवाडी, कराड प्रत्येकी 2, साळशिरंबे 6, वस्ती साकुर्डी 4, वराडे 3, बेलवडे बु.8, म्हासोली व चिखली प्रत्येकी 1. खटाव तालुक्यातील हिवरवाडी, शिंदेवाडी कटगुण, कातळगेवाडी प्रत्येकी 3, शेळकेवाडी निमसोड, मायणी प्रत्येकी 2, फडतरवाडी नेर 8, शिरसवस्ती 4, तडवळे 6, पुसेगाव (नंबर 1) 15, दरूज 10. पाटण तालुक्यातील लुगडेवाडी, हुंबरळी, पायट्याचावाडा, खुडूपलेवाडी, शेडगेवाडी (धा), गावडेवाडी, विरेवाडी प्रत्येकी 2, अटोली, आंबवणे, जुंगटी, आंबेघर किसरूळे, बाजे मारूल, सडा निनाई, काठीटेक, आंबवणे, रोमणवाडी, ऐनाचीवाडी, वाडीकोतावडे, धनगरवाडी, जोतिबाचीवाडी, वरची मेंढोशी, कोतावळेवाडी, चोरगेवाडी काळगाव, कळकेवाडी (पूर्वकडे), कळकेवाडी (पश्चिमेकडे), हुंबरणे, गोकुळ तर्फ पाटण, कदमवाडी, मठवाडी महिंद, अवसरी, चाफेर, जुंगटी प्रत्येकी 1. निसरे, सळवे प्रत्येकी 4. साखरी, जिंती इमारत, डेरवण, अंबवडे खुर्द प्रत्येकी 3, जावली तालुक्यातील महिगाव 2 गांधीनगर 3, तेटलीमुरा 1. माण तालुक्यातील कचरेवाडी 2, बिजवडी 5, ढोकमोडा (हिंगणी) 2 अशा मिळून 94 शाळांमधील 220 वर्ग खोल्या धोकादायक आहेत.