

सातारा : जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणुकीत राखीव प्रवर्गातून निवडून आलेल्या 2 हजार 56 सदस्यांनी मुदतवाढ देऊनही वैधता प्रमाणपत्र सादर केलेले नाही. त्यामुळे जिल्हाधिकार्यांनी संबंधित सदस्यांना अपात्रतेची इशारा नोटीस काढत कारवाईचा बडगा उगारला आहे. या अपात्रतेच्या टांगत्या तलवारीमुळे गावकारभार्यांत खळबळ माजली आहे.
ग्रामपंचायत निवडणुकीत खुला, इतर नागरिकांचा मागास प्रवर्ग व अनुसूचित जाती तसेच अनुसूचित जमाती या प्रवर्गातून सदस्य निवडून जातात. सदस्य होण्यासाठी त्या उमेदवाराचे नागरिकत्व, वय, मतदार नोंदणी, शिक्षण, प्रवर्ग या बाबींचा विचार केला जातो. तसेच राज्य निवडणूक आयोगाने घालून दिलेल्या नियमानुसार तो पात्र असणे आवश्यक असते. इतर नागरिकांचा मागास प्रवर्ग, अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती या राखीव प्रवर्गातून निवडून येणारा सदस्य त्याच प्रवर्गातील असणे आवश्यक असते. निवडणुकीवेळी राज्य शासनाच्या अधिकृत यादीत नाव असलेले जात प्रमाणपत्र आणि जात वैधता प्रमाणपत्र आवश्यक असते. राखीव प्रवर्गातून निवडून येणार्या महिला उमेदवारांसाठी जन्म प्रमाणपत्र, अधारकार्ड, शाळा सोडल्याचा दाखला आदी कागदपत्रांची आवश्यकता असते.
ग्रामपंचायत निवडणूक तोंडावर आली तरी अनेकांची पॅनेल तयार नसतात. अशावेळी उमेदवार अंतिम करण्यास उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस उजाडतो. त्यामुळे असतील ती कागदपत्रे घेऊन घाईगडबडीत उमेदवारी अर्ज भरले जातात. राखीव प्रवर्गातून उमेदवारी अर्ज भरताना जात वैधता प्रमाणपत्राची आश्यकता असते. मात्र निवडून आल्यानंतर सहा महिन्यांत हे प्रमाणपत्र संबंधित सदस्याने निवडणूक निर्णय अधिकार्यांकडे सादर करणे बंधनकारक असते. कोरोना काळानंतर जिल्ह्यातील शेकडो ग्रामपंचायतींच्या निवडणुका झाल्या. जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणुकांकडे राखीव प्रवर्गातून 3 हजार 121 ग्रामपंचायत सदस्य निवडून आले. या निवडणुकांना दोन, तीन वर्षे उलटून गेलेली असतानाही राखीव प्रवर्गातून निवडून आलेल्या 2 हजार 64 उमेदवारांनी जात वैधता प्रमाणपत्र दिली नाहीत. जात वैधता प्रमाणपत्र सादर न केल्याने काही ग्रामपंचायत सदस्यांबद्दल जिल्हाधिकार्यांकडे तक्रारी आल्या. तक्रारीत तथ्य आढळल्याने जिल्हाधिकार्यांनी अशा 8 सदस्यांना अपात्र केले आहे. जात वैधता प्रमाणपत्र मुदतीत सादर न करणार्या इतर 2 हजार 56 हजार सदस्यांवर आता अपात्रतेची टांगती तलवार आहे. या सदस्यांना जिल्हाधिकार्यांनी अपात्रतेची इशारा नोटीस काढली आहे. जिल्हाधिकार्यांच्या कारवाईच्या बडग्याने जिल्ह्यातीत गावकारभार्यांत खळबळ माजली आहे.