

सातारा : अजित पवार यांच्या अपघाती मृत्यूनंतर राष्ट्रवादीच्या एकत्रीकरणाची चर्चा थांबली असली, तरी आज खा. शरद पवार यांच्या सातारा दौऱ्यावेळी राष्ट्रवादीच्या दोन्ही गटातील एकात्मतेचे दर्शन झाले.
पद्मभूषण डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील यांची 67 व्या पुण्यतिथीच्या निमित्ताने त्यांच्या समाधीला अभिवादन करण्यासाठी संस्थेचे अध्यक्ष शरद पवार यांचे शुक्रवारी दुपारी साताऱ्यात आगमन झाले. यावेळी शरद पवार यांची भेट घेण्यासाठी व त्यांचे स्वागत करण्यासाठी जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातून नेते - कार्यकर्ते आले होते. त्यामध्ये राष्ट्रवादीच्या दोन्ही गटातील नेत्यांचा समावेश होता. अजित पवार यांच्या दुर्दैवी मृत्यूनंतर राष्ट्रवादीच्या एकत्रिकरणाची चर्चा सुरू झाली आणि नंतर थांबलीदेखील. परंतु, आजच्या शरद पवार यांच्या दौऱ्याच्या निमित्ताने दोन्ही गटातील एकत्रिकरणाचेच दर्शन सर्वांना झाले.
खा. शरद पवार यांच्या समवेत प्रतिभाताई पवार व खा. सुप्रिया सुळे सातारला आल्या आहेत. याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे, आ. रोहित पवार, माजी मंत्री बाळासाहेब पाटील, माजी खासदार श्रीनिवास पाटील, दीपक पवार आदी उपस्थित होतेच, त्याचप्रमाणे अजित पवार गटाचे खा. नितीन पाटील, प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब सोळसकर, प्रभाकर देशमुख, अनिल देसाई अशा प्रमुख नेत्यांनीही शरद पवार यांची भेट घेतली. या नेत्यांची उपस्थिती विशेष लक्षवेधी ठरली. पक्षाच्या एकत्रिकरणाची चर्चा थांबली असली तरी प्रत्यक्षात नेते मंडळी मनाने एकच असल्याचे त्या निमित्ताने दिसून आले.