कराड : मतदार याद्या अधिक अचूक आणि अद्ययावत करण्यासाठी सुरू असलेल्या विशेष पुनर्निरीक्षण कार्यक्रमांतर्गत कराड शहरात मोठ्या प्रमाणावर मतदार मॅपिंगचे काम सुरू असले, तरी अद्याप सुमारे 20 हजार मतदारांचे मॅपिंग बाकी असल्याची माहिती समोर आली आहे. शहरात एकूण 69 हजार 836 मतदारांची नोंद असून त्यापैकी सुमारे 50 हजार 282 मतदारांचे मॅपिंग पूर्ण झाले आहे. मात्र उर्वरित मतदारांचा शोध घेणे आणि त्यांची माहिती पडताळून नोंदी अद्ययावत करणे, हे प्रशासनासमोर मोठे आव्हान बनले आहे.
नगरपालिकेकडून या कामासाठी 72 बीएलओ नियुक्त करण्यात आले असून त्यांच्यामार्फत वार्डनिहाय घरोघरी भेट देत मतदारांची पडताळणी केली जात आहे. बीएलओ नागरिकांच्या घरी जाऊन मतदारांची ओळख, वास्तव्य, स्थलांतर, कुटुंबीयांची माहिती तसेच मतदार यादीतील तपशीलांची खातरजमा करत आहेत. अनेक ठिकाणी मॅपिंगचे काम वेगाने सुरू असले तरी काही भागांत बीएलओंना विविध अडचणींचा सामना करावा लागत आहे.
प्रशासनाच्या माहितीनुसार, अनेक मतदार शिक्षण, नोकरी किंवा व्यवसायानिमित्त बाहेरगावी गेलेले आहेत. काही नागरिक कायमस्वरूपी स्थलांतरित झाले असून त्यांच्या नावांची नोंद अजूनही जुन्या पत्त्यावर आहे. काही ठिकाणी एकाच व्यक्तीची दोन ठिकाणी नावे आढळून आली आहेत, तर काही घरे दीर्घकाळ बंद असल्याने प्रत्यक्ष पडताळणी करणे शक्य होत नाही. त्यामुळे मतदारांच्या अचूक नोंदी तयार करण्याच्या प्रक्रियेत अडथळे निर्माण होत आहेत.
आगामी विशेष पुनर्निरीक्षण कार्यक्रम आणि मतदान प्रक्रियेत कोणतीही अडचण येऊ नये, यासाठी अचूक मतदार यादी तयार करणे आवश्यक आहे. चुकीची किंवा अपूर्ण माहिती राहिल्यास भविष्यात मतदानावेळी अडचणी निर्माण होऊ शकतात. त्यामुळे प्रशासनासह संबंधित मतदाराला विनाकारण त्रास सहन करावा लागू शकतो. हेच टाळण्याचा पालिकेचा प्रयत्न आहे.
दरम्यान, नगरपालिका हद्दीत अजूनही एवढ्या मोठ्या प्रमाणावर मतदारांचे मॅपिंग अपूर्ण असल्याने प्रशासनाची धावपळ वाढली आहे. निवडणूक आयोगाच्या सूचनांनुसार मतदार यादीतील त्रुटी कमी करण्यासाठी आणि पात्र प्रत्येक नागरिकाचे नाव यादीत राहावे यासाठी ही मोहीम राबविण्यात येत आहे. विशेषतः नवमतदार, स्थलांतरित नागरिक आणि दुबार नावे असलेल्या मतदारांची माहिती अचूक करण्यावर भर दिला जात आहे. बीएलओ घरी भेट देत असताना अनेक वेळा संबंधित व्यक्ती अनुपस्थित असतात. त्यामुळे पुन्हा पुन्हा भेटी द्याव्या लागत आहेत. काही ठिकाणी नागरिकांना मॅपिंग प्रक्रियेचे महत्त्व समजून सांगावे लागत आहे. त्यामुळे कामासाठी अधिक वेळ लागत असल्याचे प्रशासनातील अधिकाऱ्यांनी सांगितले.